नागपुरात फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू तर दोन महिला जखमी
नागपुरात (Nagpur) फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला असून या स्फोटात चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे
नागपूर : नागपुरात (Nagpur) फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला असून या स्फोटात चार वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय तर दोन महिला जखमी झाल्या आहेत. नागपुरातील जुन्या व्हीसीएग्राऊंड परिसरात ही घटना घडली आहे. दोघींवर नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिलेंडरचा स्फोटाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून (Nagpur Police) अधिक तपास सुरू आहे.
मृत मुलाचे नाव सिझान आसिफ शेख असून तो चार वर्षाचा आहे. या स्फोटात फारिया हबीब शेख (वय 28 वर्षे), अनमता हबीब शेख वय (24 वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गॅसवरचे फुगे विकणारा एक व्यक्ती नागपुरातील जुन्या व्हीसीएग्राऊंड परिसरात आला होता. त्याच्यासोबत फुग्यात हवा भरणारा गॅस सिलेंडर देखील होता. फुगेवाला आल्याचं पाहून मृत सिझानने फुगे घेण्याचा हट्ट केला. त्यानंतर फुगे घेण्यासाठी ते फुगेवाल्याकडे गेले. फुगा फुगवताना अचानक त्याच्या सिलेंडरचा स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेली लोकं देखील घाबरली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु चिमुकल्या सिझानचा मृत्यू झाला होता. तर जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले.
फुगेवाल्याची माहिती समोर आलेली नाही
फुगेवाला हा सातत्याने नागपूर शहरामध्ये गॅसवरची फुगे विकत होता. पण त्याचे नाव अजून समोर आले नाही. तो रविवारी जुन्या व्हीसीएग्राऊंड परिसरात या भागात फुगे विकण्यासाठी येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तो विविध भागामध्ये फुगे विकत असे. या स्फोटामध्ये फुगेवाला जखमी झालेला नाही. या स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. तर घटनास्थळी देखील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली.
लातूरमध्ये फुग्यात हवा भरणाऱ्या गॅसचा स्फोट
फुग्यांमध्ये हवा भरण्यासाठी गॅसचा वापर करण्यात येतो. या पूर्वी लातूरमध्ये झालेल्या स्फोटामुळे लहान मुले जखमी झाली होती. त्यामुळे सिलेंडरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लातूर (Latur) शहरामध्ये फुग्यात हवा भरणाऱ्या गॅसचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून सात लहान मुलं गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या लहान मुलांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरु करण्यात आले आहे. लातूर शहरातील तावरजा कॉलनी भागातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान यामध्ये फुगे विक्रेत्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
हे ही वाचा :