Nagpur Crime News : जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या 23 वर्षीय तरुणीची हत्या नाही तर आत्महत्या, नागपूर पोलिसांचा दावा
नागपूरच्या 23 वर्षीय तरुणीची जाळून हत्या करण्यात आल्याची घटना काल समोर आली आहे. मात्र ही हत्या नसून आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
नागपूर : नागपूरच्या सुराबर्डी परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या निकिता चौधरी या 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. मात्र, निकिताच्या भावाने तिची हत्या करण्यात असल्याचा दावा करत परवा ती बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर ही पोलिसांनी गांभीर्याने निकिताचा शोध घेत नसल्याचा आरोप केला आहे.
एमबीए केल्यानंतर एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या निकिता चौधरीचा मृतदेह काल नागपूर जवळच्या सुराबर्डी परिसरात मिळाल्या नंतर नागपुरात एकच खळबळ माजली होती. 15 मार्च रोजी नित्यनियमाप्रमाणे खामला परिसरात आपल्या कार्यालयाला गेलेली निकिता संध्याकाळी उशिरापर्यंत घरी पोहोचली नव्हती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी राणा प्रताप नगर पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल संध्याकाळी सुराबर्डी परिसरात रिकाम्या म्हाडा क्वार्टर्स समोरील मैदानात निकिताचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता शेजारीच एका बॉटलमध्ये पेट्रोल-डिझेल सारखे ज्वलनशील पदार्थ असल्याने प्रकरणाचे गूढ आणखीच वाढले होते. तिची हत्या करण्यात आली असावी असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच नागपूर पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे काही सीसीटीव्ही फुटेज तसेच वैद्यकीय तज्ञांच्या प्राथमिक माहितीच्या आधारे निकिताची हत्या नव्हे तर तिने आत्महत्या केल्याचा दावा केला आहे.निकिताच्या काही मित्रांची चौकशी केल्यानंतर ती काही कारणांनी तणावात होती आणि त्याच्या मुळेच तिने टोकाचे पाऊल उचलले असावे असा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान निकिताच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या या दाव्यावर कुठलेच भाष्य केले नसले तरी निकिता बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांना माहिती दिल्यावर ही पोलिसांनी तिला शोधण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचा आरोप केला आहे. निकिताच्या कुटुंबीयांनी 15 मार्च रोजी ती बेपत्ता असल्याची तक्रार रणाप्रताप नगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली होती तेव्हा तिचा मोबाईल सुरू होता. मोबाईलचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांनी निकिताचा शोध घेण्याऐवजी ते लोकेशन तिच्या कुटुंबीयांना दिले आणि तिथे जाऊन पाहण्यास सांगितले याचा आरोप निकिताच्या भावाने केला आहे.
या प्रकरणात अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच निकिताच्या मृत्यूचा नेमका कारण काय, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान निकिता ने आत्महत्या केली, असा पोलिसांचा दावा मान्य केला तरी आत्महत्या करण्यासाठी तिने तिचा कार्यालय आणि घर असलेल्या परिसरातून लांब नागपूरच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या सुराबर्डी परिसर का गाठला?? यावेळी तिच्या सोबत आणखी कोणी होते का? उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी करणारी निकिता आत्महत्या करण्यापर्यंत का पोहोचली?? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.