Nagpur Crime : क्रिकेटचा स्कोअर विचारल्याने संताप, शिवीगाळ केल्याने वाद वाढला, दोन तरुणांवर वार; नागपुरातील घटना
Nagpur : क्रिकेटचा स्कोर काय झाला हे विचारायला गेलेल्या युवकांसोबत झालेल्या वादातून चाकूने वार करीत तरुणांना गंभीर जखमी केले. आरोपीने जवळील चाकूने वार करीत जखमी तरुणांना जखमी करुन पळ काढला.
Nagpur Crime News : नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतंगबाजी आणि जुगाराच्या वादातून सामाजिक तत्त्वांनी धुमाकूळ घातला. नाईक तलाव आणि लाडपुरा इथे रविवारी (15 जानेवारी) घडलेल्या दोन घटनांमध्ये पाच जण जखमी झाले. पोलिसांनी (Nagpur Police) याप्रकरणी सहा जणांना अटक केली.
पहिल्या घटनेत जुगार खेळणाऱ्या तिघांना क्रिकेटचा स्कोअर काय झाला हे विचारायला गेलेल्या युवकांसोबत झालेल्या वादातून चाकूने वार करत गंभीर जखमी केले. कृष्णा उर्फ गोलू मौंदेकर (वय 25 रा. तांडापेठ), रोहित भनारकर (वय 25) अशी जखमींची नावे असून अक्षय कोहाड (ता. 21 रा. तांडापेठ), सतीश वर्मा (वय 30 रा. रोड, लाडपूरा), अमोल भिवापूरकर (वय 28, तांडापेठ) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी (Nagpur Police) दिलेल्या माहितीनुसार, लाडपुरा इथे रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अक्षय, सतीश आणि अमोल हे तिघेही जुगार खेळत होते. यादरम्यान रोहितचा भाऊ राहुल भनारकरने त्यांच्याकडे क्रिकेटचा स्कोअर विचारला. मात्र, ते विचारताच, अक्षय आणि सतीशने त्याला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या कृष्णा आणि रोहितला आरोपींनी मारहाण केली. यावेळी अक्षयने त्याच्या जवळील चाकूने कृष्णा आणि रोहितवर वार करत जखमी केले आणि पळ काढला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राहुलच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांवरही गुन्हा दाखल करुन अटक केली.
पतंगबाजीतून राडा
दुसरी घटना नाईक तलाव परिसर संकुलात घडली. जखमींमध्ये ओंकार वैष्णव (वय 18 वर्षे), ऋतिक वैष्णव (वय 24 वर्षे) आणि विनय श्याम पारधी (वय 20 वर्षे) यांचा समावेश आहे. विनयची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींमध्ये रोहित मोहाडीकर (वय 20, रा. लालगंज राऊत चौक), शेख मोहसीन शेख अनीस (वय 21, रा. बंगाली पांजा आणि एक अल्पवयीन) यांचा समावेश आहे. रविवारी सायंकाळी नाईक तलावच्या मैदानावर दोन्ही गट पतंग उडवत होते. ओंकारने रोहितचा पतंग कापल्याने तो संतापला. त्याने ओंकारला पुन्हा भांडण न करण्याची सूचना केली. काही वेळाने ओंकारने पुन्हा पतंग कापला. संतापलेल्या रोहित आणि त्याच्या मित्रांनी ओंकारवर चाकूने हल्ला केला. विनय आणि ऋतिक बचावासाठी धावले असता तिघांनाही चाकूने वार करुन गंभीर जखमी केले.
ही बातमी देखील वाचा...