Ashish Deshmukh: आशिष देशमुखांवरील कारवाईवरून कॉंग्रेसमध्ये दोन गट? अद्यापही कोणतीच नोटीस मिळाली नसल्याची देशमुखांची माहिती
Ashish Deshmukh : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातल्या वादग्रस्त वक्तव्यांची कॉंग्रेस आमदार आशिष देशमुखांची मालिका अजूनही पुढे सुरु आहे.
नागपूर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरील (Nana Patole) वादग्रस्त वक्तव्याबाबत काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्यावर कारवाईसाठी शिस्तपालन समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र देशमुखांविरोधातील कारवाईवरून काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याची चर्चा सुरु आहे. कारण दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीनंतर देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र अद्याप देशमुखांना कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं समोर आलंय.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातल्या वादग्रस्त वक्तव्यांची कॉंग्रेस आमदार आशिष देशमुखांची मालिका अजूनही पुढे सुरु आहे. याच प्रकरणात कॉंग्रेस शिस्तपालन समितीनं देशमुखांना काल कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र योग्य ईमेल आयडी देऊनही नोटीस मिळाली नसल्याचा दावा देशमुखांनी केला आहे. त्यामुळे नाना पटोले यांना आशिष देशमुख यांच्यावर मनासारखी कारवाई करण्यापासून काँग्रेसमधूनच एक गट थांबवत आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. एबीपी माझाशी बोलताना आशिष देशमुख म्हणाले, माझ्या प्रकरणात अनुशासन समितीच्या बैठकीच्या दोन दिवसानंतरही कुठलीही कारणे दाखवा नोटीस मला मिळालेली नाही अशी माहिती दिली.
नाना पटोले हे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासाठी खोडा घालत असून, त्याला खोके जबाबदार असल्याचं आशीष देशमुखांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये 16 एप्रिलला मविआची वज्रमूठ सभा होत असतांना नाना पटोले सांगतात की, 21 ते 25 एप्रिलदरम्यान राहुल गांधींची नागपूरमध्ये सभा होणार आहे. राहुल गांधींची 16 एप्रिलऐवजी वेगळी वेळ मागणं हे नाना पटोलेंच्या वेगळी चूल मांडण्याचे संकेत असल्याचं देशमुखांनी सांगितलं.
मी काँग्रेसमध्येच आहे, मी राष्ट्रवादीच्या वाटेवर नाही, असंही आशीष देशमुखांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं. आशिष देशमुखांनी कॉंग्रेसला घरचा आहेर दिला आहे. शिस्तभंगाच्या कारवाईची धास्ती बाळगून आपण पक्षाची माफी मागणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. माफी मागायला मी काही राहुल गांधी नाही या शब्दात आशिष देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींनाही सुनावलं.