Nagpur Congress Agitation : नागपूरमध्ये पाण्यासाठी युवक काँग्रेस आक्रमक, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
नागपूरमध्ये पाण्याच्या प्रश्नावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. पाण्याच्या टाकीवर चढून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
Nagpur Congress Agitation : पाण्याच्या प्रश्नावरुन नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे. नागपूरच्या वंजारी नगरच्या भागात असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी साडेनऊच्या सुमारास युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दरम्यान, 8 दिवसात पाणी पुरवठा वाढवू असे आश्वासन युवक काँग्रेसला पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीने दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
सध्या काही भागात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. पाईप्सची मार्केटमधे कमतरता आहे. आम्ही यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. एक ते दोन महिन्यात काम पूर्ण होईल आणि इथे ही मुबलक पाणी मिळेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, आजच्या या युवक काँग्रेसच्या आंदोलनात स्थानिक नागरिकांनी देखील सहभाग घेतला होता. दक्षिण नागपुरात पाण्याची समस्या असून, पाणीपुरवठा करणारी कंपनी कधीच 24/7 पाणी देत नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जोरदार नारेबाजी करत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढले. सध्या फक्त चाळीस मिनिट दिवसाला पाणी येत असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळेच आज तीव्र आंदोलन करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
दक्षिण नागपुरात राहणाऱ्या नागरिकांना फक्त 40 मिनीट दररोज पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे युवक काँग्रसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 24/7 ही स्कीम आहे. मात्र, या स्कीम अंतर्गत कधीच पाणी पोहोचत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याबरोबर काही नागरिक त्यांच्यासोबत पाण्याच्या टाकीवर चढले होते. त्यानंतर लगेच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढत आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच दुसऱ्या बाजूला नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. सुरळीत पाणीपुरवठा व्हावा अशी आंदोलकांची मागणी आहे.