Nagpur Bus Conductor Strike : नागपूरकरांना दिलासा! आपली बस सेवेच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याचा मनपाकडून दावा
नागपूरकरांना दिलासा देणारी एक बातमी समोर येतेय. आपली बस सेवेतील वाहकांनी केलेला संप मिटल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आलाय.

Nagpur Conductor Strike : नागपूर शहर महापालिकेच्या 'आपली बस' (Nagpur Aapli Bus) सेवेतील सर्व कंडक्टर (वाहक) आज सकाळपासून संपावर गेले होते. मात्र आता नागपूरकरांना दिलासा देणारी एक बातमी समोर येतेय. आपली बस सेवेतील वाहकांनी केलेला संप मिटल्याचा दावा महापालिकेच्या परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी केला आहे. महापालिकेच्या दरम्यान आजच्या संपामागे शिवसेना प्रणित कामगार सेनेचे काही नेते जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वाहकांच्या खात्यात लवकरच वेतन जमा होणार
वाहकांचा पगार झाला नसल्याने सर्व वाहक संपावर गेले होते. त्यामुळे महापालिकेच्या शहर परिवहन सेवेतील आपली बसची वाहतूक खोळंबली होती. यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. आपली बस सेवेतील अठराशे वाहक आज सकाळी अचानक संपावर गेले होते. त्यांना कामावर ठेवणाऱ्या युनिटी सिक्युरिटी फोर्स या खाजगी कंपनीने वाहकांचा पगार वेळेत न दिल्यामुळे वाहकांनी संप पुकारला होता. महापालिकेने संबंधित खासगी कंपनीला वाहकांच्या पगाराचे पैसे 16 तारखेलाच पाठवले होते. मात्र बँकेच्या सर्व्हरमध्ये समस्या असल्यामुळे खाजगी कंपनीकडून वाहकांचा वेतन त्यांच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकला नव्हता असे बंटी कुकडे म्हणाले. आज सकाळी खाजगी कंपनीने सर्व वाहकांचा वेतन त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करायला सुरुवात केली आहे. काहींना वेतन खात्यात मिळाला असून उर्वरित वाहकांच्या खात्यात लवकरच वेतन जमा होईल अशी माहिती बंटी कुकडे यांनी दिली.
संपामागे कामगार सेनेचे काही नेते जबाबदार
वाहकांच्या अचानक झालेल्या संपामुळे नागपूरकरांना त्रासाला सामोरं जावं लागलं यासाठी त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. दरम्यान वाहकांच्या अचानक झालेल्या या संपामागे शिवसेना प्रणित कामगार सेनेचे काही लोक कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भारतीय कामगार सेनेचे काही लोकं वारंवार आपली बस सेवेतील वाहक आणि चालकांना चिथावणी देत असतात. यापूर्वीही नागपुरात झालेल्या काही संप मागे त्यांची भूमिका समोर आली होती. आजच्या संपामागे कामगार सेनेचे चे काही नेते जबाबदार असल्याचा आरोप बंटी कुकडे यांनी केला आहे.
शहरात बस सेवेचा खोळंबा, चाकरमानी-विद्यार्थ्यांना मनस्ताप
नागपूर महापालिकेच्या आपली बस सेवेतील सर्व कंडक्टर (वाहक) आज सकाळपासून संपावर गेल्यामुळे शहरात बस सेवेचा खोळंबा झाला होता. विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गाला अनेक त्रासाला सामोरे जावे लागत होते. महाविद्यालयात परीक्षा सुरु असल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली. युनिटी security फोर्स या खाजगी कंपनीकडे आपली बससाठी वाहक नेमणुक करण्याची आणि त्यांच्या पगाराची जबाबदारी आहे. दरम्यान महापालिका आणि आपली बससेवा चालवणाऱ्या खाजगी कंपन्या आपली बससेवेतून मोठी कमाई करतात. मात्र, वाहकांचा पगार वेळेवर का देत नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान बससेवा पूर्ववत करण्यासाठी महापालिकेच्या परिवहन समितीने ही प्रयत्न सुरू केले असून लवकरच तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान 'आपली बस' चे मुख्य डेपो असलेल्या मोरभवनमध्ये सर्व वाहक एकत्र आले होते, ते कामावर जायला तयार नसल्यामुळे शहर परिवहन सेवेतील बहुतांश बस उभ्याच होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 'साथी राहुल गांधी, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का?', भूमी अधिग्रहण कायद्यावरुन राजू शेट्टींचं पत्र
- Shiv Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का? पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची रंजक कहाणी
- सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरण; बारामती न्यायालयाकडून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
