Nagpur Accident : नागपुरातही ड्रंक अँड ड्राईव्ह! मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवले, तीन महिन्याच्या बाळाची अवस्था गंभीर
Nagpur Accident : गाडी चालवणारा तरूण आणि त्याचे इतर दोन सहकारी हे दारू प्यायले होते. पोलिसांनी गाडी तपासली असता त्यामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या.
नागपूर : पुण्यातील अपघात प्रकरण राज्यभर गाजत असतानाच दुसरीकडे नागपूर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ एका मद्यधुंद कारचालक तरुणाने तीन जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत पायी जाणारी महिला, पुरुष आणि तीन महिन्याचा चिमुकला जखमी झाला आहे. या बाळाची अवस्था गंभीर असल्याची माहिती आहे.
कारचालक आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेले त्याचे इतर दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. त्या गाडीत दारूच्या बाटल्याआणि गांजासदृष्य वस्तू सापडल्या आहेत. कारमधील एकाला जमावाने ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तर त्याचे इतर दोन सहकारी पळून गेले होते. पोलिसांनी आता त्या दोघांनाही अटक केली आहे. कारमधील तीनही तरूण दारूच्या नशेत होते. ते अमली पदार्थाच्या नशेत होते का हे पाहण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.
भरधाव वेगाने आलेल्या गाडीने तिघांना उडवलं
शहरातील महाल परिसरातील झेंडा चौकात ही घटना घडली. संध्याकाळी या परिसरात अतिशय दाटीवाटीची परिस्थिती असते. याचवेळी एक भरधाव कार आली आणि तीन जणांना उडवलं. गाडी चालवणारे बेदकारपणे गाडी चालवत होते, त्यांनी पायी चालणाऱ्या तिघांना उडवलं.
पोलिसांनी तरूणाला बेदम चोप दिला
जेव्हा ही घटना घडली, लोकांनी लगेच त्या गाडीतील तरूणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडीतील इतर दोनजण पळून गेले होते. मात्र त्यावेळी एक तरूण लोकांच्या हाती लागला. लोकांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. जखमी झालेल्यांना लोकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर चिडलेल्या लोकांनी या गाडीची नासधूस केली, या गाडीच्या काचाही फोडल्या. पोलिसांनी आता तिघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.
पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्हची घटना ताजी असतानाच नागपूरमध्येही अशीच घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं दिसतंय.
दोन जणाचा जीव घेणाऱ्या मद्यधुंद महिलाचा जामीन अर्ज फेटाळला
नागपुरात तीन महिन्यापूर्वी मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या ऋतिका ऊर्फ रितू मालू यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणी मालू यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री नागपूरच्या रामझुला ओहरब्रिजवर एक महिलेच्या बेजबाबदारपणामुळे दुचाकीवरील दोन तरुणांचा बळी गेला. या घटनेत काळ्या रंगाच्या मर्सडिजमध्ये असलेल्या ऋतिका हिने मद्यधुंद अवस्थेत अंत्यत वेगात रॅश ड्राईव्ह करत दुचकीला धडक दिली. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही बातमी वाचा: