नवाब मलिकांसारखे माझे अंडरवर्ल्डशी संबंध नाहीत, मुन्ना यादवांचं प्रत्युत्तर, मलिकांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार, कोण आहेत मुन्ना यादव?
नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासारखे माझे कुठल्याही अंडरवर्ल्ड किंवा दहशतवाद्यांशी संबंध नाही असे म्हणत भाजप नेते मुन्ना यादव (Munna Yadav) यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नागपूर : नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासारखे माझे कुठल्याही अंडरवर्ल्ड किंवा दहशतवाद्यांशी संबंध नाही असे म्हणत भाजप नेते मुन्ना यादव (Munna Yadav) यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. आज सकाळी नवाब मलिक यांनी मुन्ना यादव यांचं नाव घेत एका गुंडाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडळाचा अध्यक्ष केल्याचा आरोप केला होता. मुन्ना यादव हे कुख्यात गुंड असून त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे आहेत असा दावाही मलिक यांनी केला होता.मात्र, मुन्ना यादव यांनी मालिकांचे सर्व आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी मलिक यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत.म्हणून ते माझ्या माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करत आहेत. माझ्या विरोधात असलेल्या राजकीय गुन्ह्यांना नवाब मलिक गुन्हेगारी जगताशी जोडून मला गुंड म्हणत आहे असे मत व्यक्त केले. मलिकांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे ही मुन्ना यादव यांनी जाहीर केले. मी फडणवीस यांच्या जवळचा आहे यात दुमत नाही. फडणवीसांनी ही कधीही मी त्यांचा खास कार्यकर्ता आहे असे नाकारलेले नाही असेही मुन्ना यादव म्हणाले.
कोण आहेत मुन्ना यादव -
ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव हे नागपुरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक आणि उजवा हात म्हणून ओळखले जातात
मुन्ना यादव सुरुवातीला स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या विधानसभा मतदार संघातील चुनाभट्टी परिसरातून नगरसेवक होते...
2014 मध्ये फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांची नेमणूक महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळावर अध्यक्ष म्हणून करण्यात आली. तेव्हापासून मुन्ना यादव यांच्या पत्नी लक्ष्मी यादव ह्या मुन्ना यादव यांच्या प्रभाग क्रमांक 16 मधून नगरसेविका आहेत.
मुन्ना यादव यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्या विरोधात नागपूरच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये मारहाण धमकी देणे, खंडणी उकळणे, जमिनीच्या व्यवहारात धमकावणे असे आरोप लागून अनेक गुन्हे ही दाखल झाले आहेत. त्यापैकी काहींमध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली आहे तर काही मध्ये तपास सुरू आहे.
दाऊदच्या निकटवर्तीयांनी मलिकांच्या कुटुंबियांच्या कंपनीला जमीन विकली; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
मार्च 2016 मध्ये मुन्ना यादव आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रोशन तेलरांधे नावाच्या तरुणाला धमकी देत खंडणी मागितल्याची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती.
जुलै 2016 मध्ये मुन्ना यादव यांच्या भावाने त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका कामगाराचा पाय तोडला होता. त्या कामगाराने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर बरेच दिवस तो कामगार काही मुन्ना यादव विरोधकांसह सविधान चौकावर आंदोलनालाही बसला होता...
नोव्हेंबर 2017 चा दिवाळी मध्ये मुन्ना यादव आणि त्यांचा मुलांचा यादव कुटुंबातीलच त्यांच्या चुलत्यांसोबत भांडण झाला होता... भाऊबीजेच्या दिवशी दोन्ही कुटुंबानी एकमेकांवर हत्यारांसह जीवघेणे हल्ले केले होते.. त्यावेळेस मुन्ना यादव यांच्या विरोधात 307 म्हणजेच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता... याप्रकरणी नागपूर पोलिसांनी कमालीची दिरंगाई दाखवत तब्बल चार महिने आरोपपत्र दाखल केले नव्हते... अखेरीस मार्च 2018 मध्ये नागपूर पोलिसांनी आरोपपत्र दाखल करत याप्रकरणी हत्येच्या प्रयत्न म्हणजे 307 ची कलम वगळून मारहाणीची 326 ची कलम लावून मुन्ना यादव यांना दिलासा दिला होता.. विशेष म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी यादव कुटुंबियांमध्ये झालेल्या भांडणाचे मारहाणीचे सीसीटीव्ही आश्चर्यकारकरित्या गायब झाले होते.. याच प्रकरणाला मुन्ना यादव राजकीय हेतूने केलेला हल्ला व दाखल झालेला गुन्हा असे म्हणतात.
याच वर्षी मार्च महिन्यात पांडुरंग नगर भागातील एका भूखंडाच्या व्यवहारात महिलेला धमकी दिल्याप्रकरणी मुन्ना यादव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता...
याशिवाय मुन्ना यादव यांचे लहान भाऊ बाला यादव हे ही वादात राहिले आहे. त्यांच्यावरही अनेक भूखंड प्रकरणी धमकी दिल्याचे आरोप लागले आहे. तर मुन्ना यादव यांचे करण आणि अर्जुन नावाचे दोन चिरंजीव ही नागपुरात नेहमीच वादात राहिले आहेत... त्यांच्या विरोधातही स्वातंत्र्य किंवा प्रजासत्ताक दिनी विनापरवानगी रॅली काढणे, बाईक स्टंट करणे, महाविद्यालयात इतर विद्यार्थ्यांना धमकावणे, मारहाण करणे असे आरोप लागलेले आहेत.