मनसेचा राडा... मनसैनिकांनी आता टोलनाका फोडला; गडकरींच्या बालेकिल्ल्यातच खळखट्याक
शहराच्या तीस किलोमीटरच्या परीसरात टोलनाका नको असा नियम असताना वाहनधारकांकडून टोल आकारला जात असल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन केले.
नागपूर : राज्यात सध्या नेतेमंडळीचे दौरे सुरु असून मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याने या नेत्यांना मराठा समाजाच्या (Maratha) रोषाला सामोरे जावे लागत आहे. तर, काही ठिकाणी विविध पक्षांचे पदाधिकारीही नेत्यांना विरोध करताना दिसून येतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याला बीडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने मनसे (MNS) विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. त्यावरुन, नेत्यांच्या कारवर सुपाऱ्या, नारळ, शेण भिरकावल्याचं दिसून आलं. आता, नागपूरमध्ये (Nagpur) मनसैनिकांनी टोलानाक्यावर पुन्हा एकदा खळ खट्याक केल्याचं पाहायला मिळालं.
शहराच्या तीस किलोमीटरच्या परीसरात टोलनाका नको असा नियम असताना वाहनधारकांकडून टोल आकारला जात असल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी 5 मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. नागपूरजवळच्या वाडी शहराच्या अवतीभवती राज्य महामार्गावर 10 किलोमीटरच्या अंतरामध्येच तीन टोलनाके आहेत. या तीनही टोलनाक्यांवर खासगी वाहनांकडून टोल वसूल केला जात नाही. मात्र, वाणिज्यीक वाहनांकडून (माल वाहतूक करणारे वाहन) टोल वसुल केला जातो. त्यामुळे अगदी जवळ जवळ असलेल्या टोलनाक्यांमुळे माल वाहतूकदार त्रस्त झाले होते. माल वाहतूकदारांच्या या तक्रारीनंतर मनसेनं आज येथील टोलनाक्यावर जाऊन खळ खट्याक स्टाईलने आंदोलन केले.
दरम्यान, राज्यात मनसे पुन्हा एकदा आक्रमक शैलीत परतली असून काही दिवसांपूर्वी अकोला येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर दगडफेक करत काचा फोडल्या होत्या. त्यानंतर, ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी त्यांच्या कारवर नारळ आणि शेण फेकल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रत्त्युत्तराची पाठराखण करत, जसाश तसे उत्तर दिलं जाईल, असे म्हटलं आहे. त्यामुळे, आता मनसैनिक निवडणुकांच्या अगोदरच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच, नागपूरजवळ आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर तोडफोड करुन खळखट्याक आंदोलनाची आठवण करुन दिली आहे.
हेही वाचा
Video: अजित पवारांचे गुलाबी जॅकेट, पुतण्याच्या बदलत्या रंगावरुन काकांचा टोला, एकच हशा पिकला