Kunal Raut : कुणाल राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ; स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जाळणं भोवलं
Kunal Raut News Update : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी कुणाल राऊतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kunal Raut News Update : महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Youth Congress) कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantraveer Savarkar) यांचा पुतळा जाळल्या प्रकरणी कुणाल राऊत यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. कुणाल राऊतांसह युवक काँग्रेसच्या ( Youth Congress) 15 ते 20 कार्यकर्त्यांविरोधात नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळणे भोवले
1 फेब्रुवारीला कुणाल राऊत यांनी नागपूर विद्यापीठाच्या परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जाळला होता. पश्चिम क्षेत्रीय युवा महोत्सवात विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावरील चित्रफीत का दाखविली, असा सवाल त्यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना केला होता. दरम्यान जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या दालनातच सावरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर कुलगुरूंनी त्यांना शांत करत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सावरकरांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी धाव घेत तत्काळ आग विझविली. मात्र या प्रकारानंतर विद्यापीठातील राजकारण तापले होते.
कुणाल राऊत यांच्याविरोधात भाजप आक्रमक
परिणामी विद्यापीठ प्रशासनाने कुणाल राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजयुमोकडून करण्यात आली होती. त्यासाठी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते नागपूर विद्यापीठातील कुलगुरुंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाला बसले होते. या सगळ्या प्रकारानंतर नागपूर पोलीस विद्यापीठाच्या आवारात पोहोचले. आम्ही कुणाल राऊत यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाल्याची प्रत घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजयुमोने त्यावेळी घेतली होती.
अखेर गुन्हा दाखल
अखेर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात कुणाल राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. परवानगी न घेता आंदोलन, विद्यापीठाचे नुकसान करणे इत्यादीबाबत तक्रार नोंदवल्या गेली आहे. पोलिसांनी कुणाल राऊतसह अजित सिंह, आशिष मंडपे आणि इतर 15 ते 20 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासलं
पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतःची प्रसिद्धी करत आहेत. असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने नुकतेच आंदोलन करत नागपूरात जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले. सोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे देखील फासले. या आंदोलनानंतर भाजप आक्रमक होत त्यांनी कुणाल कुणाल राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कुणाल राऊत यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयाने कुणाल राऊतांची जामीनावर सुटका केली होती. मात्र आता पुन्हा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस पुढे काय कारवाई करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या