Sammruddhi Mahamarg :समृद्धी महामार्गाला वृक्षारोपणामुळे ब्रेक लागणार? वृक्षारोपणावर प्रशासनाचे दुर्लक्ष; पर्यावरणवाद्यांचं थेट पंतप्रधानांना साकडं
समृद्धी महामार्ग वेगवेगळ्या कारणांमुळे वारंवार समृद्धी 'वाद' मार्ग ठरतोय. कधी महामार्गावरुन हरणं धावतात तर कधी उद्घाटनअगोदर मंत्र्यांची गाडी धावते हे वाद मिटत नाही तोवर वृक्षारोपणाचा नवा वाद उफाळून आला आहे.
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं (Sammruddhi Mahamarg) उद्घाटन कधी होणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागले आहे. मात्र, या महामार्गावर आवश्यक असलेलं वृक्षारोपणच झालेलं नाही. यामुळे वृक्षारोपण झाल्याशिवाय समृद्धी महामार्ग सुरु करू नये अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी थेट पंतप्रधानांकडे केली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर खुला होण्यासाठी आणखी विलंब लागू शकतो
समृद्धी महामार्ग वेगवेगळ्या कारणांमुळे वारंवार समृद्धी 'वाद' मार्ग ठरतोय. कधी महामार्गावरुन हरणं धावतात तर कधी उद्घाटनअगोदर मंत्र्यांची गाडी धावते हे वाद मिटत नाही तोवर वृक्षारोपणाचा नवा वाद उफाळून आला आहे. समृद्धी महामार्गावर साडे सात लाख वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या मेलमध्ये त्याचीच आठवण पर्यावरणवाद्यांनी करून दिली आहे. पंतप्रधानांनी वृक्षारोपण झाल्याशिवाय महामार्गाचे उद्घाटन करू नये असे आवाहन पर्यावरणवाद्यांनी ही इमेलमध्ये करण्यात आले आहे.
पर्यावरणवाद्यांनी केलेल्या आरोपानंतर एबीपी माझाने समृद्धी महामार्गावर वृक्षारोपण झालंय की नाही याची खातरजमा केली. पण समोर चित्र मात्र वेगळेच आले आहे. महामार्गासाठी झाडांची कत्तल केली मात्र तिथे अद्याप वृक्षारोपण केलं नाही. समृद्धी महामार्ग लगत मुंबईपासून नागपूरपर्यंत गॅसची पाईपलाईन टाकायची आहे. त्याचे काम सुरु झाले असून ते संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे ती पाईपलाईन टाकल्याशिवाय केलेले वृक्षारोपण वाया जाणार अशी भीती आहे. म्हणून वृक्षारोपण केले नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
फक्त गॅस पाईपलाईन हाच वृक्षारोपणाला अडथळा नसून भविष्यातला बुलेट ट्रेन प्रकल्पही त्याला तितकाच कारणीभूत आहे. त्यामुळे एका बाजूला गॅस पाईपलाईन आणि दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेनचा प्रकल्प आला . तर लाखो झाडं लावायची कुठे? हाच प्रश्न उपस्थित करत पर्यावरणवाद्यांनी थेट पंतप्रधानांना साकडे घातलंय. त्यामुळे हा मुद्दा कोणत्या वळणावर येवून थांबतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडणारा महाकाय प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार आहे. नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.