Vidarbha Rain News : पूर्व विदर्भात पावसाची दडी, वैनगंगा नदीचं पात्र कोरडे; शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
Vidarbha Rain News : सध्या काही भागातच पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. बऱ्याच भागात पाऊस पडताना दिसत नाही.
Vidarbha Rain News : संपूर्ण राज्यात मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. मात्र, सध्या काही भागातच पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. बऱ्याच भागात पाऊस पडताना दिसत नाही. पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी पूर्व विदर्भात म्हणावं तसा पाऊस झालेला नाही. परिणामी विदर्भातील सर्वात मोठ्या वैनगंगा नदीचं गडचिरोली जिल्ह्यातील पात्र अजूनही रिकामेच दिसत आहे. नदीपात्रात सर्वत्र वाळू साठा दिसत असून पाण्याचे मोजके प्रवाह दिसून येत आहेत.
पावसाळा सुरु होऊन एक महिना होऊन गेला तरी अद्याप राज्याच्या अनेक भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहे. पावसामुळं शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली आहेत. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी पूर्व विदर्भात म्हणावं तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळं पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 45 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळं पूर्व विदर्भातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.
मागील वर्षी जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता
विशेष म्हणजे गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा विदर्भात दमदार पाऊस होत असल्यामुळं दोघांनी वैनगंगा नदीच्या पुलावर उभे राहून पुराची पाहणी केली होती. मात्र, यावर्षी परिस्थिती विपरीत दिसत असून, त्याच वैनगंगा नदीच्या पुलावरुन पाहिल्यानंतर नदीपात्र बऱ्याच अंशी कोरडा दिसून येत आहे.
उत्पन्नात घट होण्याची शक्यता
काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पण ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्या पिकांना आता पावसाची गरज आहे. मात्र, सध्या पाऊस नसल्यानं काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. शेतकऱ्यांची या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन या पिकावर भिस्त आहे. पण मृग नक्षत्राचा पाऊस बरसला नाही. त्यामुळे यावर्षी उशिरा होत असलेल्या पेरण्यामुळं उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.
पेरणीसाठी 75 ते 100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता
सध्या राज्यात काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पण शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये. जोपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करु नये. पेरणीसाठी 75 ते 100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते. त्यामुळं शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: