Nagpur News : पोलीस दलातील बदल्यांचा 'नागपुरी पॅटर्न'! पोलीस आयुक्तांची अभिनव योजना आहे तरी काय?
Nagpur Police Transfer News : नागपुरात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कमालीची पारदर्शकता आणण्यात आली आहे.
Nagpur Police Transfer News : पोलीस दलातील बदल्यांच्या (Police Transfer) विषयावरून राज्याच्या राजकारणात मोठे वादंग निर्माण झाले. सुमारे दोन वर्षांपूर्वी पोलिसांच्या बदल्यांवरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप, चौकशी आणि न्यायालयीन खटले अद्याप थांबलेले नाही. मात्र, त्याच पोलीस दलातील बदल्यांमध्ये आता एक छोटा मात्र अत्यंत सकारात्मक बदल पाहायला मिळतंय. कारण नागपुरात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कमालीची पारदर्शकता आणण्यात आली आहे. पोलीस दलातील बदल्यांचा नागपुरी पॅटर्न (Nagpur Pattern) आहे तरी काय?
पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अभिनव योजना
पोलीस दलातील बदल्यांचा नागपूरी पॅटर्न जाणून घेऊया, नागपुरात सर्व पोलीस त्यांच्या बदल्यांसाठी पोलीस आयुक्तांच्या दारात आले. मात्र, त्यांना ना कोणाच्या शिफारशींची गरज आहे. ना छुप्या अर्थपूर्ण व्यवस्थेची. कारण नागपुरात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अभिनव योजना अमलात आणली आहे. या अंतर्गत एकाच जागेवर (पदावर) पाच वर्षे पूर्ण झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या 3 जागा विचारण्यात आले. सर्व पात्र कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पसंतीच्या 3 जागा सुचवल्यानंतर सर्वाना एकाच वेळी पोलीस जिमखान्याच्या हॉलमध्ये बोलावण्यात आले. त्या ठिकाणी दर्शनी भागात लावलेल्या बोर्डावर नागपुरातील सर्व पोलीस स्टेशन्स आणि पोलिसांच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देत, त्यापैकी रिक्त असलेल्या जागा ही बोर्डावर सर्वाना दिसेल अशा पद्धतीने दर्शविल्या गेल्या. त्यानंतर प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला समोर बोलावत त्याच्या पसंतीच्या जागा विचारत उपलब्ध जागेप्रमाणे बदल्या देण्यात आल्या. इच्छेप्रमाणे आणि पारदर्शक पद्धतीने बदल्या केल्यावर पुढील तीन ते पाच वर्ष संबंधित कर्मचारी उत्साहाने काम करून जास्त चांगले रिझल्ट देतो असा अनुभव आहे. त्यामुळे बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक केल्याची प्रतिक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
नव्या पसंती विचारून शंभर टक्के पारदर्शकतेने बदल्या
पोलीस कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तीन पसंतीप्रमाणे जागा शिल्लक राहिलेल्या नसताना, त्यांना उपलब्ध जागेप्रमाणे तिथेच नव्या पसंती विचारून शंभर टक्के पारदर्शकतेने बदल्या देण्यात आल्या. अशाच पद्धतीने काल पाडव्याच्या दिवशी अवघ्या तीन तासात साडे सहाशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या समोरासमोर, कोणत्याही शिफारशी शिवाय, अर्थपूर्ण व्यवहार न होता झाल्याने पोलीस कर्मचारी ही कमालीचे खुश झाले. आज वर पोलीस दलात अशा पारदर्शक बदल्या पाहिल्या नव्हत्या. अशा सोप्या पद्धतीने होणाऱ्या बदल्यांमुळे आमचा उत्साह आणि वरिष्ठांवरचा विश्वास वाढत असल्याची पोलीस कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया आहे. तसेच कुटुंब सांभाळून पोलीस दल आणि कुटुंब असे दोन्ही कर्तव्य बजावणे सोपे होत असल्याची भावना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
अनोखा नागपूर पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवण्याची गरज
पोलीस दलात कर्मचारी सर्वात महत्वाचा घटक असतो. कायदा सुव्यवस्था सांभाळणे, वाहतूक सांभाळणे, सणांसाठी बंदोबस्त करणे, घटनांचे सर्व तपास करणे, न्यायालयीन कामं सांभाळणे हे सर्व पोलीस कर्मचारी करत असतात. त्याच पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या बदलीच्या वेळेला ऐकून घेतले. त्याची समस्या समजून घेतली तर तो समाधानाने काम करतो. कर्मचाऱ्यांना वरिष्ठांपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे एका बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पोलिसांच्या बदल्यांवरून 2 वर्षांपूर्वी सुरु झालेले वादंग आजवर थांबायची चिन्हे नसताना नागपुरात मात्र पोलिसांच्या बदल्यांसाठी राबवलेला अनोखा नागपूर पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवण्याची गरज आहे असेच म्हणावे लागेल.