मोठी बातमी : रामटेकवरून महाविकास आघाडीत मोठी बिघाडी?, बंडखोरीवरून वातावरण तापणार
Maha Vikas Aghadi : एकीकडे महाविकास आघाडीत जागावाटपाचा निर्णय होत नसल्याचे चित्र असून, दुसरीकडे रामटेकच्या जागेवरून वाद वाढला आहे.
नागपूर : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) कळीचा मुद्दा ठरलेल्या रामटेकम लोकसभा मतदारसंघातील (Ramtekam Lok Sabha Constituency) वाद काही मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. अशात आता महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या उबाठाचे सुरेश साखरे (Suresh Sakhare) यांनी काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने रामटेकची निवडणूक गांभीर्याने घेतली नाही, असे म्हणत सुरेश साखरेंनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश साखरे यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्याम बर्वे यांच्या विरोधात बंड पुकारत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशीही सुरेश साखरे आपला उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी तयार नाही. एक तर काँग्रेसने शिवसेनेच्या हक्काचा रामटेक मतदारसंघ हिसकावून घेतला आणि त्यानंतर काँग्रेस रामटेकची निवडणूक गांभीर्याने लढवत नाही असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला आहे.
काँग्रेसच्या काही नेत्यांच्या हट्टामुळे महाविकास आघाडी अडचणीत...
रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी सुरुवातीला काँग्रेस पक्षांना रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र बोगस असल्याची पूर्ण कल्पना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना होती. तरी त्यांना उमेदवारी का देण्यात आली असा सवाल सुरेश साखरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, काँग्रेसकडे जिंकून येण्यासारखे इतर अनेक उमेदवार असताना काँग्रेसच्या काही नेत्यांनी हट्ट करत रश्मी बर्वे यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघात संपूर्ण महाविकास आघाडीला अडचणीत आणले असा आरोपही सुरेश साखरे यांनी केला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाकडून कोणताही फोन आला नाही...
उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांसह अनेकांचे फोन येत आहेत. मात्र मी काँग्रेस पक्षाला बांधील नाही. मी फक्त उद्धव ठाकरे यांना बांधील आहे. त्यामुळे माझ्या पक्षाच्या निर्देशाप्रमाणे मी निर्णय घेईल असेही सुरेश साखरे यांचे म्हणणं आहे. दरम्यान अद्यापही माझ्या पक्षातून मला उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी निर्देश आलेले नाही. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज परत घेणार नाही असा दावाही त्यांनी केला आहे.
पहिल्यापासून मतदारसंघ चर्चेत...
लोकसभा निवडणुकीच्या सुरवातीपासूनच रामटेक लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला आहे. रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र बोगस असल्याचे आरोप होत होता. दरम्यान, तरीही रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्यांचा जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने त्यांना मोठा धक्का बसला. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप देखील झाले.
इतर महत्वाच्या बातम्या :