Nagpur Airport : नागपूर विमान सेवा 'रामभरोसे'; दिल्ली, मुंबईकरिता एयर इंडियाची सेवा दीर्घ काळासाठी रद्द
वीज पडल्याने तपासणी करीत असलेले 2 अभियंते वीजेच्या झटक्याने जखमी झाले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी सायंकाळी इंडिगोचे 6E 7197 विमान अहमदाबादहून नागपुरात पोहोचले. ते लखनऊला रवाना होणार होते.
नागपूर: कोविड-19 च्या पूर्वीपर्यंत नागपूर विमानतळावर मोठी वर्दळ राहात होती. आता मात्र सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही पूर्वीची वर्दळ परतलेली नाही. स्थिती सामान्य झाल्यानंतर एयरलाईन्स कंपन्यांनी काही शहरांकरिता येथून विमान सेवा तर सुरू केली होती. परंतु काही दिवसांतच ती सेवा पुन्हा बंद करण्यात आली. बंद करण्यात आलेल्या सेवांमध्ये चेन्नई फ्लाइटचाही समावेश आहे. ही फ्लाईट अस्थायी तत्वावर सुरू करण्यात आली होती, परंतु पर्याप्त प्रवासी न मिळाल्याने बंद करण्यात आली. कोलकाता जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे, परंतु तेथे जाण्यासाठी दररोज फ्लाईटची सुविधा नाही. मागील काही दिवसांपर्यंत गो एयरवेजच्या विमानांमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला, परंतु आता सेवा सामान्य झाल्याने दिलासा मिळाला आहे. त्यातच आता एयर इंडियानेसुद्धा दिल्ली, मुंबईकरिता दीर्घ काळासाठी सेवा रद्द केली आहे. सध्या येथून मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद आणि इंदूर यासारख्या शहरांकरिता फ्लाइट्स सुरू आहे.
29 ऑक्टोबरपर्यंत फ्लाईट्स रद्द
सूत्रांच्या माहितीनुसार एयर इंडिया एयरलाईन्सने येथून दिल्ली आणि मुंबईकरिताची विमान सेवा रद्द केली आहे. यात दिल्ली-नागपूर-दिल्लीकरिता फ्लाइट नंबर एआय 497 व एआय 498 व मुंबई-नागपूर-मुंबईचे फ्लाइट क्रमांक एआय 629 व एआय 630 ला 20 ऑगस्टपासून 29 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आले आहे. पुढील रणनीती निश्चित झाल्यानंतरच सेवा सुरू होईल. सध्या नागपूर विमानतळावरून मुंबईकरिता एकूण 8 फ्लाइट्स, दिल्लीकरिता 6 फ्लाइट्स, पुण्याकरिता 3, हैदराबादकरिता 1, बंगळुरूकरिता 2, अहमदाबादकरिता 2 आणि इंदूरकरिता 1 फ्लाइट सुरू आहे.
विमानाजवळ पडली वीज
शनिवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या विमानाजवळ वीज पडली. विमानातील 59 प्रवाशांना काहीच झाले नाही. पण रनवेवर तपासणी करीत असलेले दोन अभियंते वीजेच्या झटक्याने जखमी झाले. एक बेशुद्ध पडला, तर दुसऱ्याच्या हातातील त्राण गेला. त्याची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी सायंकाळी इंडिगोचे 6E 7197 विमान अहमदाबादहून नागपुरात पोहोचले. ते लखनऊला रवाना होणार होते. नागपूरचे अमित आंबटकर (वय 28) आणि उत्तराखंड काशीपूर येथील ऋषी सिंह (वय 33) हे अभियंते विमानाची नियमित तपासणी करीत होते. त्याचवेळी विमानाजवळ वीज पडली. या घटनेत आंबटकर बेशुद्ध झाले, तर ऋषी यांच्या एका हातातील त्राण गेला. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. लखनऊ-नागपूर-अहमदाबाद या विमानाचे संचालक 72 सीटांच्या एटीआर विमानाने करण्यात येते. दरम्यान या विमानाचे उड्डाण रद्द करणयात आले. काही प्रवाशांना अन्य विमानाने लखनऊला पाठविण्यात आले.