MLA Nitin Deshmukh : "तू आतमध्ये ये, तुला गेटवरच अटक करतो," पोलिसांनी नितीन देशमुख यांना धमकी दिल्याचा भास्कर जाधव यांचा दावा
बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर मुद्दाम गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात उच्चस्तरीय आधिकाऱ्यांमार्फत फेरतपासणी घेण्यात येईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
Nagpur News : अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) आणि त्यांच्या समर्थकांनी रवी भवनाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. 'तू आतमध्ये ये, तुला गेटवरच अटक करतो,' असा धमकी वजा इशारा पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांना दिला असल्याचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सांगितले. सभागृह चालू असताना 353 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावेळी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.
यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "आमदार नितीन देशमुख हे रवी भवन येथील बंगल्यावर दोनशे जणांची गर्दी घेऊन जात होते. येणाऱ्या सर्वांचे पासेस तयार करावे लागतील असे पोलिसांनी त्यांना सांगितले. यावर नितीन देशमुख आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांना दमदाटी केली. मात्र हा गुन्हा मुद्दाम दाखल करण्यात आल्याचा आरोप आमदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात उच्चस्तरीय आधिकाऱ्यांमार्फत फेरतपासणी घेण्यात येईल."
'या' कलम अंतर्गत गुन्हा दाखल...
उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी काल रवी भवनाबाहेर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांसोबत असभ्य वर्तन करुन त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच यावेळी पोलिसांवर अरेरावी करुन त्यांना धक्काबुक्की करुन आपल्यासह आलेल्या कार्यकर्त्याना रवी भवन परिसरात प्रवेश मिळवून दिला. त्यांच्या या दादागिरीविरोधात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या फिर्यादीवरुन नागपूर शहर पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सरकारी कामात हस्तक्षेप करणे, सरकारी कर्मचाऱ्यांशी बोलताना अपशब्द वापरणे त्यांना शिवीगाळ करणे याबाबत भादंवि संहिता कलम 353, 186, 448, 294, 506 आणि 34 या कलमांतर्गत नागपुरातील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी घडली होती घटना...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session) सुरु असून वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने कांबळे हे रवी भवन मुख्य प्रवेशद्वार इथे ड्युटी लागली होती. कांबळे रवी भवन इथे येणाऱ्या वाहनांचे पासेस चेक करुन तसेच येणाऱ्या व्यक्तींचे तिथेच बाजूला लागलेल्या पेन्डॉलमध्ये पासेस तयार झाल्यानंतर ते पासेस चेक करुन त्या व्यक्तींना आत प्रवेश देत होते. मंगळवारी (ता. 27 डिसेंबर) सायंकाळी आमदार देशमुख यांनी हाताने धक्का देऊन जबरदस्तीने त्यांच्यासोबत असलेल्या काही लोकांना विनापासचे रवी भवनच्या आतमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नितीन देशमुख व त्यांच्यासोबतच्या साथीदारांविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार कांबळे यांनी सदर पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर आमदार नितीन देशमुखांसह अन्य लोकांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही बातमी देखील वाचा