Indigo Flight : विमानाचे टेक ऑफ करण्यासाठी निघालेल्या पायलटला मृत्यूने गाठले; नागपूर विमानतळावरील घटना
Nagpur News : विमानाचे सारथ्य करण्यासाठी निघालेल्या वैमानिकाचा अचानकपणे मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर विमानतळावर ही घटना घडली.
नागपूर : विमानाचे सारथ्य करण्यासाठी निघालेल्या वैमानिकाचा मृत्यू झाला असल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. नागपूर विमानतळावरील (Nagpur Airport) बोर्डिंग गेट परिसरात एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. वैमानिक नागपूरहुन पुण्याला इंडिगो (Indigo) कंपनीचे विमान घेऊन जाण्यासाठी सज्ज होते. मात्र, विमानात बोर्ड होण्यापूर्वीचं ते बोर्डिंग गेट जवळ कोसळले.
आज, सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. कॅप्टन मनोज सुब्रम्हण्यम असे मृत्यू झालेल्या विमानाच्या पायलटचे नाव आहे. इंडिगो कंपनीचे विमान नागपूरहून पुण्यासाठी उड्डाण घेणार होते. त्यासाठी कॅप्टन मनोज हे निघाले असताना बोर्डिंग गेटजवळ अचानक कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचा अंदाज आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
'इंडिगो'ने काय म्हटले?
या घटनेनंतर विमान कंपनी इंडिगोने निवेदन जारी केले आहे. आज नागपूरमध्ये आमच्या एका वैमानिकाचे निधन झाल्याने दुःख झाले आहे. नागपूर विमानतळावर त्यांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्यांचे दुर्दैवी निधन झाले असल्याचे कंपनीने म्हटले.
दरम्यान, 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पायलटच्या रोस्टरनुसार, आज ड्युटीवर येण्यापूर्वी कॅप्टन मनोज यांनी विविध क्षेत्रात विमानांचे उड्डाण केले. त्याशिवाय, 27 तासांची विश्रांतीही घेतली. पायलटने काल, त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर असे दोन सेक्टर चालवले. पहाटेच्या (अंदाजे पहाटे 3 ते सकाळी 7 दरम्यान) सुमारास विमानाचे सारथ्य केले. त्यानंतर कॅप्टन मनोज यांनी 27 तास विश्रांती घेतली. त्यानंतर आज 4 सेक्टरसाठी दुपारी 1 वाजता प्रस्थान केले. नागपूरहून प्रस्थान होते. त्यांचे हे विश्रातीनंतरचे पहिले सेक्टर होते, अशी माहिती 'इंडिगो'च्यावतीने देण्यात आली आहे.
वैमानिकांचे काम हे अतिशय कौशल्याचे काम असते. त्यांच्यावर कामामुळे येणारा ताण दूर करण्यासाठी विमान कंपनीकडून त्यांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. त्यानुसार, कॅप्टन मनोज हे 27 तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामावर रूजू झाले.
बीडमध्ये 15 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू
मागील काही महिन्यांपासून कार्डिक अरेस्ट, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटना समोर येत आहे. मागील महिन्यात बीड जिल्ह्यात एका 15 वर्षीय शालेय विद्यार्थीनीचा मृत्यू झाला होता. भोवळ आल्याने ती कोसळली. तिला बेशुद्धावस्थेत शिक्षकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.