Nagpur News : नागपुरात रेल्वे रुळ ओलांडताना हेडफोन लावणं विद्यार्थिनीच्या जीवावर, रेल्वेखाली चिरडून मृत्यू
Nagpur News : नागरिकांनी रेल्वे येत असल्याचे मोठमोठ्याने आरडाओरड करुन तरुणीला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र हेडफोन लावून असल्याने तिला आवाज ऐकूच आला नाही आणि क्षणार्धात रेल्वेखाली चिरडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Nagpur News : कानात हेडफोन (Headphones) लावून बोलण्यात भान हरपलेल्या विद्यार्थिनीचा रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना नागपुरात बुधवारी (18 जानेवारी) सकाळी दहाच्या सुमारास डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. आरती मदन गुरव (वय 19 वर्षे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
आरती भंडारा जिल्ह्यातील सातोना गावची रहिवासी होती. शिक्षणासाठी ती हिंगणा तालुक्यातील टाकळघाट इथे मावशीकडे राहायची. आरती डोंगरगावजवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी टाकळघाटवरुन गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ एसटीने आली. यानंतर रेल्वे फाटकाच्या मार्गाने पायीच रेल्वे स्थानकाकडे निघाली. यावेळी आरती मोबाईलवर हेडफोन लावून बोलत जात होती.
भरधाव रेल्वेने तरुणीला 50 फुटांपर्यंत फरफटत नेले
आरती गुरव रेल्वे फाटकाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना बोलण्यात तल्लीन असल्याने तिला रेल्वेचा कुठलाही आवाज आला नाही. धडधडत येणारी रेल्वे स्थानकावरील इतरांना दिसली. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड करुन आरतीला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु हेडफोन लावून असलेल्या आरतीला त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकूच आला नाही आणि क्षणार्धात भरधाव पुणे-नागपूर रेल्वेखाली (गाडी क्र. 2129) चिरडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव रेल्वेने तिला तिला 50 फुटांपर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पथकासह दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
पतंगाच्या मागे धावताना बालकाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत पतंगाच्या मागे धावताना एका 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर घडली होती. आकाशात सुरु असलेल्या पतंगांच्या लढती बघत कुंभारटोली परिसरातील मुले उभी होती. तसेच कट झालेला पतंग पकडण्यासाठी त्या पतंग कटून जात असलेल्या दिशेने बेभान पळत सुटायची. असाच एक पतंग कट झाला आणि त्याला पकडण्यासाठी मुलांचे टोळके पतंग जात असलेल्या दिशेने पळत सुटले. दरम्यान रेल्वे ट्रॅक परिसरात रेल्वे रुळावरुन हा पतंग जाऊ लागला. हा पतंग आपण पकडू या जिद्दीने एक 13 वर्षीय मुलगा त्या दिशेने धावू लागला होता. मात्र या दरम्यान मार्गातून एक रेल्वे गाडी जात होती. मात्र पतंग पकडण्याच्या नादात या मुलाचे येणाऱ्या रेल्वेकडेही लक्ष गेले नाही. तेवढ्यात तो रेल्वेला धडकला आणि कोसळला. ध्रुव धुर्वे असं या 13 वर्षीय मुलांचं नाव आहे.
ही बातमी देखील वाचा...