(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole : विद्यार्थ्यांच्या हितासाठी MPSC चा नवीन अभ्यासक्रम दोन वर्षांनंतर लागू करा!: नाना पटोले यांची मागणी
उपमुख्यमंत्री फडणवीस विरोधी पक्षात असताना हिवाळी अधिवेशन एक महिन्याचे घ्यावे अशी मागणी करतात. आज ते सत्ताधारी आहेत, मग हिवाळी अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचेच का? असा सवालही यावेळी पटोलेंनी उपस्थित केला.
Nagpur News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत बदल करून त्याची अंमलबजवणी पुढील वर्षापासून म्हणजे 2023 पासून करण्याच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन नवीन पद्धत 2023 पासून लागू करण्याऐवजी दोन वर्षांनंतर 2025 पासून लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (INC) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
हिवाळी अधिवेशनच्या (Winter Assembly Session) पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या परीक्षा पद्धतीच्या बदलाचे आकलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा अवधी देणे गरजेचे आहे. लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न पुर्ण होण्यात या नवीन पद्धतीने अडचण निर्माण होऊ शकते. पुरेसा कालावधी मिळाला तर विद्यार्थ्यांना तयारी करण्यास वेळ मिळून त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदतच होईल. याचा सारासार विचार करून दोन वर्षांनंतर नवीन अभ्यासक्रम लागू करावा.
नागपूरमध्ये दोन-तीन वर्षांच्या कालावधीनंतर हिवाळी अधिवेशन होत असून हे अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचेच ठेवण्यात आले आहे. विदर्भाच्या प्रश्नांचा विचार करून हे अधिवेशन किमान तीन आठवडे तरी घ्यावे अशी विरोधी पक्षाने मागणी केली होती पण सरकारने मात्र त्याकडे लक्ष दिले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरोधी पक्षात असताना मात्र हिवाळी अधिवेशन एक महिन्याचे घ्यावे अशी मागणी करत असत. आज ते सत्ताधारी आहेत, उपमुख्यमंत्री आहेत मग हिवाळी अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचेच का? एक महिन्याचे का घेत नाहीत? विदर्भाच्या प्रश्नांना फडणवीस यांना न्याय द्यायचा नाही का? भाजपा आणि फडणवीस यांना विदर्भातील जनतेची मते फक्त निवडणुका जिंकण्यासाठी हवी आहेत, त्यांच्या विकासाच्या प्रश्नावर अधिवेशन एक महिना का घेत नाहीत? असे सवाल विचारत 'क्या हुआ तेरा वादा'? या फिल्मी डॉयलॉगमधून पटोले यांनी फडणवीस यांना त्यांच्या विधानाची आठवण करून दिली.
'सरकारकडून काम करण्याऐवजी नको ते उद्योग सुरु'; अजित पवारांचा हल्लाबोल
अजित पवार म्हणाले की, हे अधिवेशन तीन आठवड्याचं घ्यावं अशी आमची मागणी आहे. सरकारकडून काम करण्याऐवजी नको ते उद्योग सुरु आहेत, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. अजित पवार म्हणाले की, आम्हाला चहापणाला उपस्थित रहा असं सांगितलं, मात्र 6 महिने सरकारं सत्तेवर आलं आहे. मात्र जनतेच्या अपेक्षा यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. अनेक मंत्री, आमदार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. सीमा प्रश्नाबाबत देखील अजून पुरेशी उपाययोजना केलेली नाही. 865 गावांचा प्रश्न अजून कायम आहे. आहे ती गावे इतर ठिकाणी जाण्यासाठी ठराव करू लागली आहेत. असा प्रयत्न 62 वर्षात कधीही झाला नव्हता. त्यावेळी पलीकडच्या राज्यांतील गावे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक होती. मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. उलट आत्ताचे मंत्री पुरेशी बाजू देखील मांडू शकले नाहीत, असंही ते म्हणाले.
ही बातमी देखील वाचा