एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिमग्याच्या मुहूर्तावर मुंबई उच्च न्यायालयात रंगला 'हायव्होल्टेज ड्रामा'
वाघमारे आणि इतर चौघांविरुद्ध नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या फौजदारी अवमान याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती झका हक आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासमोर सुनावणी सुरु होती.
नागपूर/मुंबई : शिमग्याच्या मुहूर्तावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. वकील अरविंद वाघमारे यांच्यावरील अवमान कारवाईची बुधवारी सुनावणी सुरु असतानाच त्यांच्याविरुद्ध आणखी एक अवमान नोटीस जारी झाली आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र अखेरीस कोर्टाची बिनशर्त माफी मागितल्यामुळे त्यांना कारवाईपासून दिलासा मिळाला. प्रकरणावरील सुनावणी पाहण्यासाठी न्यायालयाच्या दालनात आणि बाहेरही वकिलांची तोबा गर्दी झाली होती.
"एखाद्या वकिलाला शिक्षा करुन आम्हाला कोणताही आनंद मिळत नाही. परंतु, परिस्थिती खूपच गंभीर झाल्यास कारवाई करणे आवश्यक होऊन जाते," या शब्दांत वाघमारे यांना समज देऊन भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्यास हायकोर्टाने बजावलं आहे.
वाघमारे आणि इतर चौघांविरुद्ध हायकोर्टानेच दाखल केलेल्या फौजदारी अवमान याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती झका हक आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु होती. या सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी वाघमारे यांनी केल्याने, एक लाख रुपये भरल्यानंतर कोर्टाने त्याचीही परवानगी दिली होती. जेव्हा हायकोर्टाने याप्रकरणी निकालाचं वाचन सुरु केलं तेव्हा वाघमारे यांनी न्यायमूर्तींबाबत आक्षेपार्ह आरोप करण्यास सुरुवात केली. हायकोर्टावर थेट पक्षपातीपणाचे आरोप करत आपल्याला या खंडपीठापुढे हा खटला चालवायचाच नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. न्यायमूर्तींनी सुरुवातीला त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने न्यायमूर्तींनी वाघमारे यांच्याविरोधात नव्याने अवमान नोटीस काढत पोलिसांना बोलावून ताब्यात घेण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर या प्रकरणावर दुसऱ्या सत्रातील सुनावणी सुरु झाल्यावर वाघमारे यांनी कोर्टाची काही अटींवर माफी मारुन अवमान कारवाई रद्द करण्याची विनंती कोर्टाकडे केली. मात्र जोपर्यंत बिनशर्त माफी मागत नाही तोपर्यंत ही कारवाई रद्द होणार नसल्याचं स्पष्ट करत हायकोर्टाने पुन्हा एकदा ही सुनावणी तहकूब केली. न्यायालयाचा पवित्रा पाहता अखेरीस तिसऱ्यांदा सुरु झालेल्या सुनावणीत आपला बिनशर्त माफीनामा सादर करुन वाघमारे यांनी कोर्टाची माफी मागितली.
"वाघमारे हे पत्रकार परिषद घेऊन, मोबाईलवर लोकांना मेसेज आणि व्हिडीओ पाठवून कोर्टाचा अपमान करु शकतात. मात्र कोर्ट किंवा न्यायमूर्ती ही कृती करु शकत नाहीत. त्यांना स्वत:चा बचाव इथेच करावा लागतो. त्यामुळे वाघमारे यांनी भविष्यात पुन्हा अशी कृती करू नये," अशी समज देण्यात आली. तसंच नव्याने दाखल केलेली अवमान याचिका रद्द करत जुन्या अवमान याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने 2 एप्रिलपर्यंत तहकूब केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement