(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WCL Nagpur : वेकोलिच्या सुरक्षारक्षकांवर गोळीबार; इंदर कोळसा खाणीतील घटना
गोळीबार करणाऱ्याचे नाव अद्याप पोलिसांकडून सांगण्यात आले नाही. या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे
Nagpur News : नागपुरात वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या लि. (WCL) कन्हान जवळच्या इंदर कोळसा खाण क्रमांक-6 येथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकांवर (security guard) मोटारसायकलवर आलेल्या दोघांपैकी एकाने गोळीबार (open firing) केला. एका सुरक्षारक्षकाला गोळी लागल्याचे बघताच दोघेही पसार झाले. गोळी लागलेला एक सुरक्षारक्षक यात गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (11 डिसेंबर) सायंकाळी घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेलं असून गोळीबाराचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
मिलिंद समाधान खोब्रागडे (वय 29 वर्षे, रा. अकोला) असे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. मिलिंद एमएसपीएल नामक खासगी सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षारक्षक पदावर नोकरी करतो. तो रविवारी सायंकाळी वेकोलिच्या इंदर कोळसा खाण क्रमांक-6 च्या चेकपोस्टवर कर्तव्यावर होता. त्यातच मोटारसायकलवर दोघे त्या चेकपोस्ट जवळ आले. त्यातील एकाने सुरक्षारक्षकांच्या दिशेने गोळीबार केला. यात गोळ्या लागल्याने मिलिंद गंभीर जखमी झाला. आरोपी घटनास्थळाहून पळून जाताच वेकोलिच्या कर्मचाऱ्यांनी मिलिंदला लगेच कन्हान शहरातील वेकोलिच्या रुग्णालयात आणले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला कामठी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दोन गोळ्या डोक्यात, तर एक गोळी पोटात शिरली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून, तो अत्यवस्थ असल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.
गोळीबार करणारा पोलिसांच्या ताब्यात
- गोळीबार करणाऱ्याचे आणि साथीदाराचे नाव अद्याप पोलिसांकडून सांगण्यात आले नाही. या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. घटनेनंतर आरोपींनीच आत्मसमर्पण केले असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होती.
- प्राप्त माहितीनुसार गोळीबार करणारा खाण क्रमांक-4 भागातील रहिवासी असून, त्यांची सैन्याची पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर कोर्ट मार्शल अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. नोकरी गेल्यानंतर तो मूळगावी राहायला आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याने सुरक्षारक्षकांवर गोळीबार का केला, हे मात्र कळू शकले नाही.
कथित पुढाऱ्यांचेही कंत्राटदारांना त्रास
वेकोलीच्या (WCL) प्रत्येक खाणीजवळ गुंड (Nagpur Crime) प्रवृत्तीच्या लोकांकडून रंगदारी करण्यात येते. याठिकाणी सेवा पुरवणारे कंत्राटदार आदींना अनेक गावगुंड आणि स्थानिक पुढारी यांचे 'समाधान' केल्याशिवाय व्यवसाय करता येत नाही. ज्यांनी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देण्यात येत असतात. मात्र अनेक कंत्राटदारांनी या पुढारी आणि गुंडांना 'सेट' केले असल्याने कंत्राटदार मुक्तपणे व्यवसाय करतात. मात्र याची कुठलीही जबाबदारी वेकोली प्रशासनाकडून घेण्यात येत नाही. आपल्या परिसराबाहेर काय होते त्याच्याशी आपले घेणे-देणे नसल्याचे सांगत प्रशासन हातवर करत असते.
ही बातमी देखील वाचा