VIDEO : 'धर्मवीर 3' ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर पुढे काय झालं ते मलाच माहिती : एकनाथ शिंदे
Dharmaveer : आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर काय काय घडलं हे मला माहिती आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. दिघेंचे काम एक दोन चित्रपटातून मांडता येणार नाही असंही ते म्हणाले.

नागपूर : धर्मवीर 2 चित्रपटानंतर (Dharmaveer 2) सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. आनंद दिघेंचं (Anand Dighe) काम हे एवढं मोठं आहे की ते एक-दोन सिनेमात सामावू शकत नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. धर्मवीर 3 हा चित्रपट आलाच तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाच्या माझा व्हिजन या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं.
स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर आतापर्यंत धर्मवीर आणि धर्मवीर 2 असे चित्रपट आले आहेत. धर्मवीर 2 मध्ये आनंद दिघे यांचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं. दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचं दाखवण्यात आलं. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं. आनंद दिघे यांच्या मृत्यूवर शंकाही उपस्थित केली जाऊ लागली. त्यामुळे शिंदेंनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे.
Eknath Shinde On Dharmaveer : नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
धर्मवीर 3 चित्रपट येणार का आणि आला तर त्याची स्क्रिप्ट कोण लिहिणार असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की," आनंद दिघे यांचं काम काही एक दोन चित्रपटातून मांडता येणार नाही, त्यांचं काम मोठं आहे. पण धर्मवीर 3 चित्रपट आला तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल. कारण त्यानंतर पुढे काय झालं हे मलाच माहिती आहे."
Eknath Shinde Interview : जनतेने पोचपावती दिली
साडे तीन वर्षाच्या सरकारला मी 100 टक्के मार्क देणार. आम्ही तिघेजण तीन शिफ्टमध्ये काम करणारे लोक आहोत. आम्हाला जो विजय मिळाला ती जनतेने दिलेली पोचपावती आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. नगरपालिका निडणूकीत विरोधक दिसले नाहीत. विरोधकांना हरण्याचा कॉन्फिडन्स आहे. फेसबुक लाईव्हवरुन तरी सभा करायच्या होत्या असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
काही ठिकाणी आम्ही युती केली, मात्र काही ठिकाणी स्थानिक पातळीवर समीकरणांमुळे वेगळे लढलो. कणकवलीसारख्या शिवसेना-उबाठा युती या निवडणुकीच्या काळात काही छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. पंतप्रधान मोदी एनडीच्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत, त्यांचे हात मजबूत करायचे आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Eknath Shinde Speech : विकासासाठी आम्ही दिल्लीत जातो
एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिंदे दिल्लीत गेले किंवा दरेगावाला गेले तरी चर्चा होते. आम्ही एनडीएचा मोठा घटकपक्ष म्हणून दिल्लीत मोदीजी, अमित भाईंची भेट घेतो. कोणत्याही नाराजीसाठी त्यांना भेटत नाही. राज्य पातळीवरचे प्रश्न आम्ही तिघे सोडवतो. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही जातो, बार्गेनींगसाठी नाही."
महाराष्ट्राचा विकास हेच आमचं व्हिजन आहे. कोस्टल रोड, अटल सेतू, कारशेड, मेट्रो ही कामं दिसतायत. लोकांना फायदा होतो आहे. मुंबई- वरळी सी लिंक आता वांद्रे ते वर्सोवा, पुढे विरार, वाढवणपर्यंत नेत आहोत असं एकनाथ शिंदे म्हणाले.






















