(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, नागपूरमधील घटना
Dog Byte Death : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Dog Byte Death : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अंजली रावत असे मृत मुलीचे नाव आहे. ती नागपूर जवळच्या भारकस गावात राहत होती. धक्कादायक म्हणजे भारकस गावात भटके कुत्रे आणि डुकरांचा प्रचंड दहशत असून अंजलीच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी चिमुकल्यांना एकटे घराबाहेर पाठवणेच बंद केले आहे. स्थानिक ग्रामपंचायत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने अनेक तक्रारींकडे लक्ष न दिल्यामुळे ही घटना घडल्याचं गावकर्यांचा आरोप आहे.
नागपूर जवळच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या भारकस गावात चार वर्षांची अंजली रावत आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. तिचे दोन्ही पालक जवळच्या औद्योगिक क्षेत्रात कामगार आहेत. 13 जानेवारी रोजी अंजलीचे आई वडील कामावर गेले होते, त्यावेळी दुपारच्या वेळी अंजली घरासमोर खेळत होती. त्याचवेळी एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. घाबरलेली अंजली किंचाळली, हे पाहून आणखी दोन कुत्रे तिच्यावर धावून आले. तिन्ही कुत्र्यांनी तिला कंबर, पाठ आणि पायांवर चावे घेतले. शेजार्यांना अंजलीचा किंचाळण्याचा आवाज गेल्यानंतर काही महिला धावल्या आणि अंजलीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली.
गावकऱ्यांनी अंजलीला जवळच्या टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र कुत्र्यांनी भयावह पद्धतीने तिच्या शरीराचे लचके तोडल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढचा उपचार शक्य नसल्याने तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रेफर केले. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अंजलीवर उपचार झाले. मात्र तिच्या शरीरात संक्रमण वाढल्यामुळे अखेरीस सोमवारी तिचा मृत्यू झाला. टाकळघाट येथेच त्वरीत उपचार मिळाले असते तर अंजलीचा जीव वाचला असता, असे तिच्या नातेवाईकांचे आरोप आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला भटके कुत्रे आणि डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी पत्रही पाठवले आहे. अंजली रावच्या दुर्दैवी मृत्युनंतर आधीच भटके कुत्रे आणि डुक्करांमध्ये त्रस्त असलेल्या गावात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गावकर्यांनी आपल्या मुलांना बाहेर खेळायला पाठवणे ही बंद केले आहे. गावकर्यांचा आरोप आहे की गावाच्या वेशीवर अनेक अनधिकृत मास विक्रेते असून त्यांच्याकडून मटणाची योग्य विल्हेवाट लावली जात नाही.. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा लवकर बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.