Coronavirus | नागपुरात एका रुग्णामुळे 37 जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग
नागपूरच्या संतरंजीपुरा भागात राहणारी 68 वर्षांच्या व्यक्तीचा 5 एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या वृद्ध व्यक्तीच्या संपर्कात एकूण 192 लोकं आली होती. त्यापैकी 37 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
नागपूर : नागपूरमध्ये आतापर्यंत 72 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आज ही कोरोनाबाधितांची संख्या 9 ने वाढली आहे. गेले 3 दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने नागपूरकरांची चिंता वाढली आहे. मात्र, नागपूरकारांची चिंता वाढवणारी एक गोष्ट म्हणजे एकाच कोरोनाबाधित रुग्णामुळे नागपुरात मोठ्या संख्येने संक्रमण झाले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे नागपुरातील 72 कोरोना बाधितांपैकी तब्बल 37 रुग्ण एकाच व्यक्तीमुळे संक्रमित झाले आहे.
नागपूरच्या संतरंजीपुरा भागात राहणारी 68 वर्षांच्या व्यक्तीचा 5 एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. न्यूमोनियाची तक्रार असल्यामुळे त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर झालेल्या चाचणीत हे वृद्ध कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले होते.
महापालिकेने त्वरित हे वृद्ध राहत असलेल्या संतरंजीपुरा परिसरात या वृद्धाच्या संपर्कात असलेल्यांचा शोध सुरू केला. 5 एप्रिल रोजी या वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर संतरंजीपुरा भागात कोरोनाचा शिरकाव झाल्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, दाटीवाटीच्या या परिसरात कोरोना एवढ्या तीव्रतेने पसरेल असे कोणाला ही वाटले नव्हते. आतापर्यंत महापालिकेने गोळा केलेल्या माहिती प्रमाणे या एकच वृद्ध व्यक्तीच्या संपर्कात एकूण 192 लोकं आले होते. त्यापैकी 83 तर खूप close contact म्हणजे वारंवार संपर्कात असलेले नातेवाईक, शेजारी आणि परिसरातील काही नागरिक होते.
धक्कादायक म्हणजे या 192 लोकांपैकी आतापर्यंत 37 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 144 अहवाल (ज्यापैकी काही एकदा निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा तपासणीसाठी पाठवले आहेत) अजून ही यायचे आहेत. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणि आजवर आरोग्य यंत्रणेशी संपर्क न केलेल्या लोकांनी त्यांच्या जीवनाला असलेला धोका लक्षात घेत आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावे, असं आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.
दरम्यान, नागपुरात आज 9 कोरोना पॉसिटिव्ह रुग्ण वाढले आहे. त्यामुळे नागपुरातल्या कोरोना बांधितांची संख्या आता 72 वर पोहोचली आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 6 जण शांतीनगर परिसरातील आहेत. तर 1 जण सतरंजीपुरा परिसरातील आहे. तर इतर दोघे मोमीनपुरा आणि कुंदनलाल गुप्ता नगरमधील आहेत. आज ज्या 9 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या सर्वांना आधीपासूनच आमदार निवास येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच शांतीनगर परिसरातून मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यामुळे आता शांतीनगर परिसरातील अनेक वस्त्या सील करण्यात आल्या आहेत.
नागपुरात आजवर आढळलेल्या 72 कोरोना बाधितांपैकी आतापर्यंत 12 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट
सतरंजीपुरा - याच भागातून सर्वाधिक कोरोना रुग्णाला समोर आले आहेत. याच भागातील एका 68 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. नागपूरचे निम्म्याहून अधिक कोरोना रुग्ण याच संतरंजीपुरा भागातून आले आहेत.
शांतीनगर - शांतीनगर परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसात अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
मोमीनपुरा - दोन आठवड्यापूर्वी या भागातून कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर नव्याने आणखी एक रुग्ण येथे वाढला आहे.
गिट्टीखदान - या भागातील काही वस्त्यांमधून ही तुरळक प्रमाणात कोरोना संक्रमित प्रकरण समोर आले आहे.
खामला - या भागातून सुरुवातीला अनेक कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र, आता त्यापैकी बहुतांशी रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. नव्याने या भागात रुग्ण आढळलेले नाही.
जरीपटका - या भागातून सुरुवातीला अनेक कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र, आता त्यापैकी बहुतांशी रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे. नव्याने या भागात रुग्ण आढळलेले नाही.
संबंधित बातम्या