Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Solapur Municipal Corporation Election: पहिल्या यादीत 6 उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. महिला अध्यक्ष, माजी नगरसेविका सुनीता रोटे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे.

Solapur Municipal Corporation Election: सोलापूर मनपा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटप होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सोलापुरात राष्ट्रवादीला 20 जागा मिळाल्या आहेत. पहिल्या यादीत 6 उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष, माजी नगरसेविका सुनीता रोटे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. इतर पाच नवे चेहरे दिले आहेत.
राष्ट्रवादीकडून कोणते सहा उमेदवार जाहीर?
राष्ट्रवादीचे पहिल्या यादीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ड मधून राकेश मनोहर सोनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 8 अ मधून मोहम्मद नकीब हासीब कुरेशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 17 क मधून बिस्मिल्ला शिकलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 23 अ मधून सुनिता दादाराव रोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 26 अ मधून नागिणी प्रवीण इरकशेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर प्रभाग क्रमांक 18 क मधून अंबादास सोमण्णा नडगीरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीतीलच एका अधिकृत उमेदवाराने थेट एमआयएममध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असलेल्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आज एमआयएममध्ये प्रवेश केला. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी आणि निरीक्षक अन्वर सादात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. फिरदोस पटेल या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. 2017 मध्ये त्या काँग्रेसच्या तिकिटावर सोलापूर महापालिकेत निवडून आल्या होत्या.
दरम्यान, काँग्रेसने सोलापूरमध्ये 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच फिरदोस पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत एमआयएममध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप फिरदोस पटेल यांनी केला आहे. त्या एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांच्या नातेवाईक असून, शौकत पठाण यांच्या मध्यस्थीने त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















