(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress vs Bjp : नागपुरात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, गुन्हे दाखल
Congress vs Bjp, Nagpur : नागपूरमध्ये रविवारी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे.
Congress vs Bjp, Nagpur : नागपूरमध्ये रविवारी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी जरीपटका परिसरात भाजप नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयात झालेल्या तोडफोड आणि राडा प्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षाविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयासमोर आणि कार्यालयात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयात तोडफोड करत महिला कार्यकर्त्यांशी अभद्रता केल्याप्रकरणी कांग्रेस नेता बाबूखान आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तोडफोड, दंगल तसेच विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मोर्चाच्या स्वरूपात कुकरेजा यांच्या कार्यालयात कांग्रेस नेता बाबूखानसोबत आलेल्या महिलांसोबत अभद्र व्यवहार करत त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजप नेते वीरेंद्र कुकरेजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात मारहाण, विनयभंग आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांनी असा आरोप केला आहे की, काँग्रेस कार्यकर्ता बाबूखान आणि त्याच्यासोबत आलेल्या काही महिला पुरुषांनी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात वाद घातला. त्यानंतर तोडफोड करत तेथील साहित्याची नासधूस केली. वीरेंद्र कुकरेजा प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक आहेत. मात्र समतानगर आणि सुगतनगर परिसरात त्यांचे लक्ष नाही. काँग्रेस कार्यकर्ता बाबू खानच्या नेतृत्वात आज काही लोकांनी कुकरेजा यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचे प्रयत्न केला. त्यावेळी तेथे पहिल्यांदा शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वाद झाला. यामध्ये कार्यालयातील तोडफोड झाल्याचे समजते.
दरम्यान, मारहाणीच्या प्रकरणानंतर नागपूरच्या जरीपटका पोलिस स्टेशन अंतर्गत वसनशहा चौकावर काही भाजप कार्यकर्त्यांनी टायर जाळून तोडफोडीचा निषेध व्यक्त केला. कुकरेजा यांच्या कार्यालयात येऊन भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करत फर्निचरची तोडफोड करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पकडण्याऐवजी पोलीस भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करत आहेत. असा रोष व्यक्त करत वसनशहा चौकावर टायर जाळण्यात आले.