Congress : आमच्या बैठकीतच माझ्या घातपाताचा प्रयत्न, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप, नाना पटोलेंसमोर दोन गट भिडले, एकमेकांचे कपडे फाडले!
Congress Nagpur Meeting : काँग्रेसच्या बैठकीत ज्या दोन नेत्याध्ये वाद होऊन प्रचंड गोंधळ झाला. त्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहे.
नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha 2024) तयारी म्हणून काँग्रेसकडून पूर्व विदर्भातील जिल्हानिहाय आढावा बैठक नागपूरच्या (Nagpur) महाकाळकर सभागृहात ठेवली होती. मात्र, या बैठकीत पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला. नरेंद्र जिचकार (Narendra Jichkar) आणि विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांच्यात जोरदार वादावादी आणि राडा झाला. या बैठकीतच माझा घातपात करण्याचा डाव होता, असा धक्कादायक आरोप जिचकार यांनी केला. तर, विकास ठाकरे यांनी जिचकार हे मानसिक रुग्ण असून कुटुंबाने किंवा पक्षाने वैदकिय चाचणी करावी असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या....
काँग्रेसच्या बैठकीत ज्या दोन नेत्याध्ये वाद होऊन प्रचंड गोंधळ झाला. त्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहे. आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप करणाऱ्या नरेंद्र जिचकार यांनी आमदार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरेवर गंभीर आरोप करत विकास ठाकरे यांनी आधीच पक्षाच्या बैठकीत गुंड बोलावले होते. त्यांच्याकडे हत्यार होते आणि आजच्याच बैठकीत माझा घात करण्याचा कट होता असा आरोप एबीपी माझाशी बोलताना केला आहे. विकास ठाकरे गेले दहा वर्ष नागपूर शहर अध्यक्ष असून केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी एका पदावर एकच व्यक्तीने राहावे असे निर्देश दिल्यानंतर ही पद सोडत नाही. प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेतेही त्यांच्या जागी दुसऱ्याची नेमणूक करत नाही. आजच्या बैठकीत काँग्रेसच्या उदयपूर अधिवेशनाच्या ठरावानुसार हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला असता विकास ठाकरे यांनी माझा घातपात करण्यासाठी आधीच आणलेले गुंड मला मारायला पुढे आल्याचे जिचकार यांनी केले. आता पक्षश्रेष्ठींनी विकास ठाकरे विरोधात कारवाई करावी अशी मागणी ही नरेंद्र जिचकार यांनी केली आहे.
तर, नरेंद्र जिचकार मानसिक रुग्ण आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी त्यांची वैद्यकीय चाचणी करावी असे मत आजच्या गोंधळानंतर नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. पक्षाचे बैठकीत कोणतेही गुंड नव्हते. तर ते सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. नरेंद्र जिचकार नेहमीच पक्षाच्या बैठकांमध्ये गोंधळ घालतात. त्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष उफाळून आला. पक्षश्रेष्ठींनी नरेंद्र जिचकार यांच्या विरोधात अनुशासनात्मक कारवाई करावी अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे.
बैठकीत नेमकं काय घडलं?
नागपूरमधील या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार, माजी खासदार विलास मुत्तेमवार, इतर स्थानिक नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या समोर हा राडा झाला. आढावा बैठकीला सुरुवात नागपूर शहर काँग्रेसच्या आढावा बैठकीपासून झाली. बैठकीची सुरवात नाना पाटोले यांच्या संबोधनाने झाली. बैठकीचा उद्देश आणि पुढील निवडणुकींच्या दृष्टीने तयारीवर नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी शहर कार्यकारिणीची माहिती दिली, त्यानंतर त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचा आढावा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सूचना करत आपले मत मांडले.
मंडल कमिटी, बुथ प्रमुख (BLO) ग्राम समित्या, ब्लॉक कार्यकारिणी जिल्ह्यातील संघटनात्मक माहिती आगामी लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम बाबत कसे काम करायचे याची माहिती दिली. त्याशिवाय, तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत, लोकापर्यंत पोहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अन् राडा सुरू झाला...
त्यानंतर शहर अद्यक्ष विकास ठाकरे यांनी बैठकीत समारोपीय मत मांडले आणि बैठक संपली अशी घोषणा केली. त्यातच प्रदेश महासचिव नरेंद्र जिचकार माईक जवळ आले आणि त्यांनी विकास ठाकरे यांचा माईक घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विकास ठाकरे माईक दिला नाही त्यामुळे नरेंद्र जिचकार यांनी तो ओढण्याचा प्रयत्न केला. त्यात झालेल्या झटापटीत विकास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र जिचकार यांना व्यासपीठावरून खाली खेचले व धक्काबुक्की केली. त्यात जिचकार यांच्यासह काही कार्यकर्त्यांचे कपडे फाटले.
काही खुर्च्यांची फेकाफेक झाली. या गोंधळातच नरेंद्र जिचकार यांना बाजूच्या खोलीत नेण्यात आले. त्यानंतर साधारण एक तास सभागृहात गोंधळाची स्थिती शांत होत नव्हती. त्यामुळे नंतर नाना पटोलेंसह, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत, विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी सर्व नेत्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.
काही नेते वेटिंग रूम मध्ये गेले तर विजय वडेट्टीवार व सुनील केदार सभागृहाच्या बाहेर गेले. नेत्यांनी सुरुवातीला विकास ठाकरे यांना बैठक ठिकाणावरून दुसरीकडे पाठवण्यात आले. नंतर नागपूर ग्रामीणची बैठक सुरू झाली. त्या बैठकीत नरेंद्र जिचकार यांनी शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना हुसकावून लावले. शेवटी नरेंद्र जिचकार यांना सभागृहात बाहेर पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा बैठकीला सुरुवात करण्यात आली.