(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrayaan-3 Isro : 'चांद्रयान-3'च्या लँडरची सॉफ्ट लँडिंग झाली नाही तर...; इस्रोचा प्लान बी काय?
Chandrayaan-3 Landing : आज भारतीय अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने आणि भारतासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. चांद्रयान-3चे आज चंद्राच्या भूमीवर सॉफ्ट लँडिंग होणार आहे. मात्र, इस्रोकडून प्लान बीदेखील तयार ठेवण्यात आला आहे.
नागपूर : 'चांद्रयान-3'च्या लँडरची सॉफ्ट लँडिंग आज सायंकाळी 6.04 च्या सुमारास झाली नाही तर ती पुढे केव्हा होईल? जर प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरचा प्रोपेलशन मॉड्युल सोबत संपर्क होऊ शकला नाही तर इस्रोचा (ISRO) प्लान बी काय?? 'चांद्रयान-2'चा ऑर्बिटर अडचणीच्या वेळेस कसा कामी येईल? लॅन्डरची गती 30 किलोमीटर उंचीवरून कशी कमी करावी लागेल, त्यात रेट्रो बूस्टरची भूमिका काय? अखेरच्या पाच किलोमीटर पासून 300 मीटर उंचीपर्यंत गती कमी करण्यासाठी कंट्रोलेबल थ्रस्टर्स ही खास यंत्रणा काय करणार? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. इस्राोने या चांद्रमोहीमेत नियोजन केले असून प्लान बी देखील तयार ठेवला आहे.
युरोपमधील खाजगी अवकाश संशोधन संस्थांसोबत काम करणारे अवकाश शास्त्रज्ञ राजेश मुनेश्वर यांच्यासोबत 'एबीपी माझा'ने 'चांद्रयान-3' मोहिमेबद्दलच्या सर्व प्रश्नांबद्दल विशेष संवाद साधला. राजेश मुनेश्वर यांच्या मते चांद्रयान तीन मोहिमेत अंतिम काही तास जास्त थरारक असून अखेरचे सात मिनिटं तर "सेवेन मिनिट्स ऑफ टेरर"असे असणार आहेत. मात्र, त्या आधी अखेरच्या दोन तासात केली जाणारी डीबूस्टिंग ही तेवढीच महत्वाची ठरणार आहे. या दोन तासात सर्व काही अनुकूल दिसलं तरच सॉफ्ट लेंडिंगचा निर्णय इस्रोचे शास्त्रज्ञ घेणार आहे. अन्यथा सॉफ्ट लँडिंग चार दिवसानंतर 27 ऑगस्ट रोजी होऊ शकेल असे त्यांचे म्हणणे आहे.
अवकाश शास्त्रज्ञ राजेश मुनेश्वर यांनी सांगितले की, लँडर मॉड्युल (विक्रम लॅण्डर आणि प्रज्ञान रोव्हर) लँड होत असताना त्याला आधी हंड्रेड बाय थर्टी (100 x 30km) किलोमीटरच्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये यावं लागणार आहे.
30 किलोमीटरच्या उंचीवरून लँडर मॉड्युलची गती कमी करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी आधीच काळजी घेऊन शास्त्रज्ञांनी 'चांद्रयान-2'च्या तुलनेत 'चांद्रयान-3' मध्ये एक रेट्रो बूस्टर कमी केले आहे. त्यामुळेच 'चांद्रयान-3' मध्ये रेट्रो बूस्टरची संख्या 5 ऐवजी 4 ठेवली आहे. 30 किलोमीटर उंचीपासून हे रेट्रो बूस्टर गती कमी करत आणतील. तर अखेरच्या 5 किलोमीटर ते 300 मीटरच्या उंची दरम्यान दोन कंट्रोलेबल थ्रस्टर्स (Thrusters) चालू बंद (स्विच ऑन अँड स्विच ऑफ) करत करत लॅन्डर मॉड्युलची गती आणखी कमी करतील. अखेरच्या काही मीटर उंची दरम्यान त्याची गती 1.6 मीटर प्रति सेकंदपर्यंत कमी होईल आणि त्यानंतरच सॉफ्ट लँडिंग शक्य होईल असे राजेश मुनेश्वर यांनी सांगितले.
लँडिंगचा निर्णय दोन तास आधीच?
दरम्यान, सायंकाळी 6.04 वाजता 'चांद्रयान-3'च्या लँडरची सॉफ्ट लँडिंग होऊ शकली नाही. तर ती किमान चार दिवसांनी पुढे ढकलावी लागेल. मात्र, सॉफ्ट लँडिंग 6.04 वाजता होणार की नाही याचा निर्णय दोन तास आधी जेव्हा अखेरची डीबूस्टिंग सुरू होईल, तेव्हाच घ्यावा लागणार असल्याचे राजेश मुनेश्वर यांनी सांगितले. एकदा अखेरची डीबूस्टिंग सुरू करताना सॉफ्ट लँडिंग 6.04 वाजता करण्याचा निर्णय घेतला. तर ती 6.04 वाजताच करावी लागणार आहे.
काय आहे प्लान बी?
'चांद्रयान-3'चा लँडर मॉड्युल आणि 'चांद्रयान-2' चा ऑर्बिटर या दोघांचा काही तासांपूर्वी आपापसात संपर्क झाला आहे, हे फार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आज, सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि त्याच्यातून प्रज्ञान रोवर बाहेर निघेल... तेव्हा प्रज्ञान सर्वात आधी लँडर विक्रमसोबत संपर्क साधेल आणि लँडर विक्रम प्रोपेलशन मोड्युलला संपर्क साधेल आणि तिथून बंगलुरुजवळ उभारलेल्या इंडियन डीप स्पेस नेटवर्कला संपर्क साधेल. मात्र, जर काही कारणांनी प्रोपेलशन मोड्युलमध्ये बिघाड निर्माण झाला, त्यावेळेस विक्रम लँडर प्रोपेशनल मॉडयुल ऐवजी चांद्रयान दोनच्या ऑर्बिटरसोबत संपर्क साधेल. 'चांद्रयान-2'चा ऑर्बिटर इंडियन डीप स्पेस नेटवर्क सोबत संपर्क स्थापन करून देईल. त्यामुळे 'चांद्रयान-2' चा ऑर्बिटर आपल्यासाठी संपर्क साधण्याचा 'प्लॅन बी' म्हणून काम करणार आहे..
तर चांद्रयान-2 दोनचा ऑर्बिटर आपला लँडर कुठे लँडिंग करत आहे याची माहिती शास्त्रज्ञांना देत राहणार आहे. भारत जर 'चांद्रयान-3' च्या लँडरची सॉफ्ट लँडिंग करू शकला, तर भारत अवकाशात कुठल्याही पद्धतीच्या खडतर ठिकाणी सॉफ्ट लेंडिंग करू शकेल हे जगासमोर सिद्ध होईल, असे राजेश मुनेश्वर यांनी सांगितले.