गंगा जमुना वस्तीत छुपं तळघर अन् भुयारी मार्ग, अल्पवयीन मुलींना डांबून ठेवलं जातं, भाजपचा गंभीर आरोप
नागपूरच्या मध्यस्थानी वसलेली ही गंगा जमुना वस्ती. वरकरणी इतर कोणत्याही सामान्य वस्ती सारख्या दिसणाऱ्या या वस्तीतील प्रशस्त इमारतीत माणुसकीला काळिमा फासणारे धंदे चालत असल्याचे आरोप होत आहेत.
नागपूर : नागपूरच्या गंगा जमुना वस्तीतल्या 188 कुंटणखाण्यात छुपं तळघर आणि भुयारी मार्ग असून त्या ठिकाणी अनेक अल्पवयीन मुलींना डांबून ठेवलं जातं. परराज्यातून अपहरण करून किंवा फसवून आणलेल्या 13 ते 14 वर्षांच्या मुलींना हार्मोनचं इंजेक्शन देऊन कोवळ्या वयातच शारीरिकदृष्ट्या देह व्यापारासाठी तयार केलं जातं. अनेक महिने अंधारलेल्या तळघरात ठेऊन या मुलींना मानसिकरीत्या देह व्यापारासाठी मजबूर केलं जातं, असे गंभीर आरोप भाजपनं केले आहेत. पोलिसांनी या कुंटणखान्यांच्या आत लपलेल्या या तळघरांना उध्वस्त करावं, अशी मागणीही भाजपनं केली आहे.
वारांगणांचं नेतृत्व करणाऱ्या ज्वाला धोटे यांनी अशा तळघरांचा आरोप बिनबुडाचा असल्याचं सांगत आरोप करणारे भाजपवाले आजवर झोपले होते का? त्यांचे सरकार असताना हे कुंटणखाने आणि अल्पवयीन मुलींना डांबण्यासाठी असलेले तळघर त्यांना दिसले नाही का? असा सवाल उचलला आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत 7 कुंटणखाने सील केले असून इतर ठिकाणी पुन्हा देह व्यापार दिसून आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
नागपूरच्या मध्यस्थानी वसलेली ही गंगा जमुना वस्ती. वरकरणी इतर कोणत्याही सामान्य वस्ती सारख्या दिसणाऱ्या या वस्तीतील प्रशस्त इमारतीत माणुसकीला काळिमा फासणारे धंदे चालत असल्याचे आरोप होत आहेत. गंगा जमुना वस्तीच्या अवतीभवती राहणारे नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी या इमारतींमध्ये अनेक कुंटणखाने असून त्यांच्या खाली छुपे तळघर आणि भुयारी मार्ग आहेत. या तळघरात परराज्यातून अपहरण करून आणलेल्या किंवा गरीब पालकांकडून खरेदी केलेल्या शेकडो अल्पवयीन मुलींना डांबून ठेऊन त्यांना मारहाण केली जाते. एवढंच नाहीतर या अल्पवयीन मुली कोवळ्या वयात देह व्यवसायासाठी शारीरिक दृष्ट्या तयार व्हाव्यात यासाठी त्यांना हार्मोनचं इंजेक्शन दिलं जात असल्याचा गंभीर आरोप भाजापनं केला आहे. प्रत्येक अल्पवयीन मुलीला जोवर ती देह व्यवसायासाठी होकार देत नाही, तोवर शारीरिक यातना देऊन अंधारात डांबलं जातं. तिचं मानसिक खच्चीकरण करत तिला होकार देण्यासाठी मजबूर केलं जात असल्याचा आरोप स्थानिक भाजप नेते आणि याच वस्तीतच्या शेजारी लहानाचे मोठे झालेल्या मनोज चापले यांनी केला आहे. दरम्यान, गंगा जमुनाच्या अवतीभवती राहणाऱ्या सामान्य महिलांनी वस्तीतील वेश्या व्यवसायामुळे आंबट शौकीन आता त्यांच्या घरापर्यंत येऊन तुमचे किती दर (वेश्या व्यवसायसाठी किती दर घेता) आहे, असे विचारू लागल्याचे आरोपही केले आहेत.
वारांगनांचे नेतृत्व करणाऱ्या जव्वाला धोटे यांनी मात्र भाजपचे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हणत गंगा जमुना वस्तीत एकही तळघर किंवा भुयार नसल्याचा दावा केला आहे. एवढ्या वर्षांपासून स्थानिक नगरसेवक आणि आमदार भाजपचे असताना, 5 वर्ष गृह विभाग सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना, भाजपनं कारवाई का केली नाही? असा सवाल धोटे यांनी विचारला आहे.
भाजपनं फक्त गंगा जमुनामधील गैर कारभारावरच बोट ठेवलेलं नाहीतर ज्वाला धोटे हे वारांगनांकडून पैसे घेऊन आंदोलन करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रत्येक आंदोलनासाठी त्या 50 हजार रुपये घेऊन आंदोलन करत असल्याचा आरोप स्थानिक भाजप आमदार विकास कुंभारे यांनी केला आहे. ज्वाला धोटे मात्र भाजपच्या या आरोपामुळं कमालीच्या संतापल्या आहेत. विकास कुंभारे यांनी आपली लायकी दाखवली आहे. कुंभारे यांचे दिवस भरले असून त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे किंवा कायदेशीर कारवाईसाठी तयार रहावं, असा इशारा दिला आहे.
वारांगनांच्या वस्तीत तळघर आणि भुयारी मार्ग असल्याचे आरोप झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्या ठिकाणी 188 कुंटणखाने असून सर्वांना देह व्यवसाय बंद करण्याचे निर्देश आधीच दिले असून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या 7 कुंटणखान्यांना सील केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. जे जे बेकायदेशीर आहे, त्या विरोधात पोलीस कारवाई करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, एबीपी माझानं नागपुरातील गंगा जमुना वस्तीत सध्या काय स्थिती आहे? हे छुप्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी एक महिन्यापूर्वी लावलेले बंदोबस्त आता सैल झाल्यामुळे पुन्हा देह व्यापार छुप्या पद्धतीनं सुरु झाल्याचं दिसून आलं. विशेषतः सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर ग्राहक वस्तीत येत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूरच्या मध्यवस्तीत वेश्या व्यवसाय सुरु झाल्याचे दिसून येत आहे. आता नेत्यांमध्ये होत असलेले आरोप प्रत्यारोप आणि पोलिसांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर शहराच्या मध्यस्थानी वेश्या व्यवसाय चालणारी वस्ती, हवी की नको? हा वाद कोणत्या दिशेनं जातो, हे पाहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
देहविक्रीच्या विरोधात आंदोलन करणारे अनेक पुरुष कधीकाळी आमच्याकडे येत होते, वारंगनांचा गौप्यस्फोट