OBC Reservation : ओबीसी समाजाला दिलेल्या आश्वासनाचे पुढे काय ? ओबीसी महासंघाचे अध्यक्ष घेणार उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट
OBC Reservation : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे हे ओबीसींच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
नागपूर : राज्यात सध्या ओबीसी (OBC) विरुद्ध मराठा (Maratha) अशी परिस्थिती पाहायला मिळतेय. त्यातच जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी नेत्यांकडून ओबीसी महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात होते . तर मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील हे देखील महाराष्ट्रभर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा जोर धरु लागलाय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे ( Babanrao Taiwade ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातील त्यांच्या राहत्या घरी भेट घेणार आहे.ओबीसी समाजाच्या संविधानीक अधिकारावर तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाप्रमाणे ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर देखील चर्चा करावी अशी मागणी देखील ते करणार असल्याची माहिती समोर आहे.
ओबीसी समाजाला दिलेल्या आश्वासनाचे पुढे काय झाले ?
ओबीसींवर अन्याय होणार नाही, तसेच मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलतांना दाखविला होता. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे हे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटी संदर्भात अधिक माहिती देतांना डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले की, सप्टेंबरला सरकारसोबत जी बैठक झाली होती,त्यामध्ये सरकार आणि प्रशासनाकडून ओबीसी समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी काही आश्वासन देण्यात आले होते. मात्र आज जवळपास दोन महिने झाले, तरी काही मागण्यांसंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे त्याची आठवण करून देण्यासाठी आज उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचे तायवाडे म्हणाले.
कुणबी जाती प्रमाणेच ओबीसी समाजाच्या इतर जातींबद्दल ही शोध घ्यावा
शिंदे समिती कुणबी जातीची नोंद शोधण्याचा काम संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहे. त्याप्रमाणेच आमची मागणी आहे की शिंदे समितीने ओबीसी समाजाच्या इतर जातींबद्दल ही शोध घ्यावा.त्यामुळे या जातीतील अशा व्यक्तींना ज्यांची जातीची नोंद असूनही त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नसेल, त्यांना मदत होईल.असे झाल्यास शिंदे समितीच्या कामाचा लाभ इतर जातींना ही होईल.असे मत डॉ. बबनराव तायवाडे यांनी बोलतांना व्यक्त केले.
ओबीसीसाठी हिवाळी अधिवेशनात एक दिवस वेळ राखीव ठेवून चर्चा करावी
हिवाळी अधिवेशनामध्ये आठ तारखेला मराठा समाजाचे प्रश्नावर चर्चा होणार आहे.आमची अशी मागणी आहे की हिवाळी अधिवेशनात एक दिवस ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वेळ राखीव ठेवून चर्चा करावी, अशी मागणी यावेळी तायवाडे यांनी केलीये.
नुकतच सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाच्या मागासलेपणाचे प्रकरण पुन्हा नव्याने देऊन मराठा समाज मागास सिद्ध होऊ शकतो का या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण करावे अशी विनंती केलीये. त्या संदर्भात आमची विनंती आहे की मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करताना कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी या सहा जातीना वगळून मराठा समाज मागास आहे का याचा देखील अभ्यास करावा. या सहा जाती आधीच ओबीसी समाजामध्ये आहे. त्यामुळे मराठा समाजाचा मागासलेपणाचा अभ्यास करताना या जातींना वगळून सर्वेक्षण करावे अशी आमची मागणी असल्याचे देखील डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले.