Rohit Pawar : युवा संघर्ष यात्रेनंतर पोलिसांसोबत झटापट, रोहित पवारांना ताब्यात घेऊन पोलिसांनी नेले कुठे?
Rohit Pawar Detain : युवा संघर्ष यात्रेवर लाठीचार्ज झाल्यानंतर रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्तवातील युवा संघर्ष यात्रेची (Yuva Sangharsh Yatra) समारोपाची सभा संपल्यानंतर विधानसभेकडे कूच करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. आपल्या मागण्यांसाठी विधानसभेवर धडकणाऱ्या या यात्रेला पोलिसांनी अडवले असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनीही पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या संघर्षात आमदार रोहित पवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेत खासगी वाहनात बसवले.
रोहित पवारांना पोलिसांनी नेले कुठं?
रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अधिवेशन काळात जे नियमभंग करतात त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये नेलं जातं. रोहित पवार यांनाही याच डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आले. त्यामुळे रोहित पवार विधानभवनात जाऊ शकले नाहीत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, "रोहित पवार यांच्याशी आम्ही चर्चा केली. पण त्यांनी सहकार्य करण्यास नकार दिला. युवा संघर्ष मोर्चा यांच्यामार्फत आंदोलन करण्यात येत होतं.रोहित पवार यांनी विधानभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे रोहित पवार यांना ताब्यात घेऊन डिटेन्शन सेंटरला नेण्यात आलं. या सर्व राड्याचं व्हिडीओ फुटेज आमच्याकडे आहे. ते पाहून आम्ही योग्य ती कारवाई करू असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
रोहित पवारांना ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. रोहित पवार यांनी पोलिसांच्या गाडीजवळ ठिय्या मांडला. कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे परिसरात एकच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं.
रोहित पवार काय म्हणाले?
राज्यात युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. MPSC परीक्षेसंदर्भात प्रश्न आहेत, शिष्यवृत्तीचा मुद्दा आहे, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही निघालो आहोत. पण या मुद्द्यांची दखल घेण्यासाठी, निवेदन स्वीकारण्यासाठी कोणी जबाबदार व्यक्ती नाही, त्यामुळे आम्ही हे निवेदन घेऊन जात आहोत, असं रोहित पवार म्हणाले. एखाद्या आमदाराचे जर कुणी ऐकत नसेल तर सामान्य माणसाचे कुणी ऐकणार? हे सरकार भित्रं आहे असंही ते म्हणाले. या सरकारला अहंकार आहे. महिलांचे, तरुणांचे, MPSC परीक्षार्थींचे, शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत. याबाबते निवेदन दिले, हे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करु असं म्हटलं. पण यांना अहंकार आहे. तहसीलदार आणि भाजपच्या अध्यक्षांना आमच्याकडे पाठवत आहेत, असेही पवार यांनी म्हटले.