हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
Nagpur Violence: नागपूरच्या भालदारपुरा परिसरात गोंधळ घालणाऱ्या दंगलखोरांना (Nagpur violence) काबुत आणताना नागपूर पोलिसांचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी गंभीर जखमी झाले.

नागपूर : नागपूरच्या भालदारपुरा परिसरात गोंधळ घालणाऱ्या दंगलखोरांना (Nagpur violence) काबुत आणताना नागपूर पोलिसांचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यापैकीच एक म्हणजे नागपूरचे वाहतूक पोलीस उपायुक्त अर्चित चांडक. सोमवारी अर्चित चांडक त्यांच्या सहकाऱ्यांसह दंगल सदृश परिस्थिती मध्ये कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत असताना एक मोठा दगड त्यांच्या पायाच्या गुडघ्यावर लागला. संध्याकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मात्र तेव्हा परिस्थिती अत्यंत जास्त चिघळलेली असल्याने अर्चित चांडक यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढील अडीच तास दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्याचा आणि नंतर पकडण्याचे कर्तव्य बजावत राहिले.
मात्र दुखापत होऊनही त्यांनी अडीच तास त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या पायातील गुडघ्याचे लिगामेंट्स फाटले आहे. त्यामुळे पुढील सहा आठवडे अर्चित चांडक यांना चालणे कठीण होऊन बसले आहे. एबीपी माझाशी विशेष बातचीत करताना अर्चित चांडक यांनी सोमवारी रात्री किती भयावह परिस्थितीमध्ये पोलिसांना दंगल सदृश्य स्थिती नियंत्रणात आणावी लागली, हे सांगितले आहे.
तणाव असलेल्या भागात पोलिसांचा रुट मार्च, आत्तापर्यंत 50 लोकांना अटक
दरम्यान, नागपुरात काल (18 मार्च) रात्रीच्या सुमारास तणाव असलेल्या भागात नागपूर पोलिसांनी रुट मार्च काढण्यात आलाय. रूट मार्च काढत अजून काही लोक अप्रिय घटना घडविण्याच्या तयारीत तर नाही ना, याची पाहणी करून अभ्यास करणार आहेत. आणि परिसरातील नागरिकांच्या पाठीशी सुरक्षेला पोलिस आहे, असा विश्वास दर्शविणार आहेत. ही गंभीर घटना आहे आणि आम्ही या घटनेला सिरीयसली घेत आहोत, यामध्ये जे लोक सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. वेगवेगळे दृश्य आणि वेगवेगळे माहिती या आधारावर कोण मास्टरमाईंड होत या आधारावर चौकशी करणार असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल म्हणाले.
उपयुक्तांवर केला कुऱ्हाडीने हल्ला
जमावाने एका उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला केला असून इतरांवर दगड व इतर वस्तू फेकल्याने अनेक पोलीस व नागरिक जखमी झाले. त्यापैकी दोन उपयुक्तांसाह एकूण 22 जण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये पोलीस उपायुक्त झोन 5 निकेतन कदम, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) शशिकांत सातव यांच्यासह एकूण 15 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 2 अग्निशमन दलाचे जवान आणि 5 नागरिकांनाही जखमी अवस्थेत तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले गेले. दरम्यान निकेतन कदम यांना कुऱ्हाडीचे दोन घाव लागले असून जखम खोल असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर शशिकांत सातव यांच्या पायावर रॉडने हल्ला केल्याची डॉक्टरांची प्राथमिक माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















