(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : नागपुरातील 15 हजार चिमुकल्यांच्या पोषण आहारासाठी 'अक्षय पात्र'चा पुढाकार ; दोन एकर जागेत साकारणार भव्य किचन
Nagpur : वर्षभरासाठी एका विद्यार्थ्याच्या मध्यान्ह पोषण आहाराची जबाबदारी नागरिकांना घेता येणार आहे. यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक मुलांची जबाबदारी नागरिकांना घेता येईल.
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे 15 हजार बालकांच्या पोषण आहारासाठी अक्षय पात्र फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. यापूर्वी 2016 ते 2021 दरम्यान जिल्ह्यातील 160 शाळांमधील 15 हजार बालकांना संस्थेच्यावतीने पोषण आहार पुरविण्यात आले असल्याची माहिती अक्षय पात्र फाऊंडेशनचे (Akshaya Patra Foundation) श्रीधर व्यंकट यांनी दिली. उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नागपूर जिल्ह्यात वाठोडा येथील रिंग रोडवर 2016 ते 2021 दरम्यान तात्पुरते स्वयंपाकघराच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात आले होते. मात्र काही कारणांमुळे 2021नंतर हे स्वयंपाक घर बंद पडले आहे. मात्र आता कायमस्वरूपी स्वयंपाकघराची निर्मिती सुमारे दोन एकर जागेत करुन ही योजना सुरु करण्यात येणार आहे. यासाठी परसिस्टंट सिस्टिमचे समिर बोंद्रे, मुळ नागपूरचे आणि सध्या अमेरिकेत कार्यरत शेअर अवर स्ट्रेन्थचे सीईओ जितेंद्र जोधपुरकर, अक्षय पात्र फाऊंडेशनचे श्रीधर श्रीधर व्यंकट, समिर बोंद्रे, सचिन जहांगिरदार आदी एकत्र आले आहे.
'फिड द फ्यूचर' अंतर्गत घ्या बालकांचे पालकत्व
नागपुरात या कार्यात नागरिकांनाही सहभागी होता येणार असून वर्षभरासाठी एका विद्यार्थ्याच्या मध्यान्ह पोषण आहाराची जबाबदारी नागरिकांना घेता येणार आहे. यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक मुलांची जबाबदारी नागरिकांना घेता येईल. यासाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाने येत्या 26 फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच पासून सुरु होणाऱ्या एक दिवसीय कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, प्रसिद्ध एथलिट यांच्याशी संवाद, कलावंत, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ विविध कार्यक्रम घेणार आहे. तसेच या एक दिवसीय कार्यक्रमातून उभारण्यात येणारा पूर्ण निधी हा भव्य किचन उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
'शेअर अवर स्ट्रेन्थ' कडून नागपूरची निवड
अमेरिकेतील गरीब विद्यार्थ्यांच्या भोजनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या शेअर अवर स्ट्रेन्थ संस्थेतर्फे भारतातील अक्षय पात्र फाऊंडेशन सोबत सामंजस्य करार झाला आहे. तसेच देशातील या संस्थेची ही पहिलीच भागीदारी ठरणार आहे. तसेच 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमातून उभारण्यात येणाऱ्या निधीची मॅचिंग ग्रॉंट (जितका निधी उभारला तेवढाच निधी) या उपक्रमासाठी देण्यात येणार असल्याची माहिती शेअर अवर स्ट्रेन्थचे सीईओ जितेंद्र जोधपूरकर यांनी दिली.
ही बातमी देखील वाचा...