Nagpur Railway Time Table : नागपूर ते पुणे जाताय, ही बातमी तुमच्यासाठी; 'ही' रेल्वे गाडी दोन दिवसांसाठी रद्द; या तीन गाड्यांचे मार्गही बदलले
महाराष्ट्र एक्स्प्रेस दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आली असून हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस, हटिया-पुणे एक्स्प्रेस आणि पुणे-हावडा दुरंतो एक्स्प्रेसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.
Nagpur Railway News : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कोपरगाव ते कान्हेगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाचे आणि कोपरगाव स्थानकाचे आधुनिकीकरण केले जाणार असल्याने 20 ते 25 जानेवारी दरम्यान नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेतर्फे नागपूरमार्गे चालवण्यात येणारी कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. यासह अनेक गाड्यांच्या मार्गांतही बदल झाले आहे. गाडी क्रमांक 11039 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर)- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 26 आणि 27 जानेवारीला रद्द केली आहे. यासह 11040 गोंदिया- श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) महाराष्ट्र एक्स्प्रेस 28 आणि 29 जानेवारीला धावणार नाही.
'या' गाड्यांचा मार्ग बदलला
यासह तीन गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. 12130 हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस 26 जानेवारीला आणि 22846 हटिया-पुणे एक्स्प्रेस 27 जानेवारीला नागपूर, बल्लारशाह, काजीपेठ, सिकंदराबाद, वाडी, दौड मार्गे पुणे जाणार आहे. 12221 पुणे-हावडा दुरंतो एक्स्प्रेस 28 जानेवारीला दौंड, जंक्शन वाडी, सिकंदराबाद, काजीपेठ, बल्लारशाह नागपूरमार्गे हावडा स्थानक गाठेल.
वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा मिळावा यासाठी प्रयत्न - खासदार सुनील मेंढे
नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्स्प्रेसला विदर्भात केवळ एकच थांबा देण्यात आला आहे. भंडारा आणि तुमसर येथेही या गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी सातत्याने होते आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांनी तेव्हाच ही मागणी केली होती. यासंदर्भात नुकतीच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विलासपूर विभागीय बैठकीच्या नागपूर (Nagpur) येथील विभागीय रेल्वे कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा, (Bhandara) गोंदिया (Gondia) जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे (Sunil Mendhe) हे या बैठकीचे सभापती होते. रेल्वेसंबंधी असलेल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, आवश्यक तिथे मंत्री स्तरावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे खासदार सुनील मेंढे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करा, प्रवासी संघटनेची मागणी
बिलासपूर-नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. रायपूरहून नागपुरात (Nagpur Railway) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना परत जाण्यासाठी दुपारी 2 ऐवजी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांची वेळ झाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो. वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. वंदे भारतच्या वेळेत बदल केल्यास मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळू शकतील. तेव्हा याकडे लक्ष देण्याची मागणी रेल्वेकडे करण्यात आली आहे.
ही बातमी देखील वाचा...