Nagpur News : नागपुरातील 18 वर्षाखालील 4 लाखांवर बालकांची होणार आरोग्य तपासणी; 'या' टेस्टनंतर उच्चस्तरीय उपचार अन् शस्त्रक्रियाही निःशुल्क
NMC : या मोहिमेत खासगी बालरोगतज्ज्ञांचेही यासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. प्राथमिक तपासणीनंतर आवश्यकता भासल्यास, बालकास संदर्भसेवा, उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील.
Nagpur Health News : नागपुरातील 18 वर्षांखालील सुमारे 4 लाख 18 हजार 593 बालकांची निशुल्क आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ या अभियानाची सुरुवात उद्या, गुरुवारपासून करण्यात येणार आहे. या अंतर्गत वजन उंचीनुसार बालकाची सुदृढता मोजली जाईल. जन्मजात व्यंग असल्यास ते तपासणे, रक्ताक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, अस्थमा, एपिलेस्पि इ. आजारांचे संशयित रुग्ण ओळखून त्यांना संदर्भित केले जाईल. याशिवाय विकासात्मक विलंब, ऑटीझम इत्यादी मानसिक स्वरुपाच्या आजारांवरही उपचार केले जातील.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या निर्देशानुसार महानगरपालिका (NMC) कार्यक्षेत्रामध्ये गुरुवार, 9 फेब्रुवारीपासून ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ अभियान सुरु होत आहे. अभियान अंमलबजावणी संदर्भात मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. मोहिमेअंतर्गत बालकांची तपासणी शासकीय निमशासकीय शाळा, कनिष्ठ विद्यालय, खासगी शाळा, अंध दिव्यांग शाळा, अंगणवाडी, खासगी बालवाडी, बालसुधारगृह व अनाथ आश्रम या ठिकाणी करण्यात येणार आहे. यात शहरातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील 4,18,539 बालकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
आठ आठवड्यांचे उद्दिष्ट
पुढील 8 आठवड्यामध्ये ही मोहिम शहरातील सर्व अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय, खासगी शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. प्रत्येक पथकाने एका दिवसात किमान 150 बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे उद्दिष्टय आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांचीही मदत घेतली जाईल. शहरातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र परीसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थांची अभियानाअंतर्गत तपासणी होणार असून, अभियानात शाळाबाह्य मुलांचीही तपासणी करण्यात येणार आहे. बैठकीदरम्यान मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी अभियानाच्या स्वरूपाबाबत माहिती दिली. तर मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मनपा कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील 0 ते 18 वर्ष वयोगटीतील बालकांची अभियानाअंतर्गत तपासणी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. यासाठी संबधित शाळेतील शिक्षकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
प्राथमिक तपासणीनंतर संदर्भीय सेवा
प्राथमिक स्तरावर तपासणीत वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एलएचव्ही, आरोग्य सहाय्यक यांच्यास्तरावर तपासणी होईल. तसेच संबधित झोनमधील खासगी बालरोगतज्ज्ञांचेही यासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. प्राथमिक तपासणीनंतर आवश्यकता भासल्यास, बालकास संदर्भसेवा, उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील.
अशा होतील तपासण्या
या अभियानात बालकांची संपूर्ण आरोग्य तपासणी होईल. वजन उंचीनुसार बालकाची सुदृढता मोजली जाईल. जन्मजात व्यंग असल्यास ते तपासणे, रक्ताक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, अस्थमा, एपिलेस्पि इ. आजारांचे संशयित रुग्ण ओळखून त्यांना संदर्भित केले जाईल. याशिवाय विकासात्मक विलंब, ऑटीझम इत्यादी मानसिक स्वरुपाच्या आजारांवरही उपचार केले जातील.
ही बातमी देखील वाचा...