राहुल गांधींची खिल्ली उडवणारी जाहिरात बनवणाऱ्या कंपनीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा हल्लाबोल, कार्यालयाची तोडफोड
युवक काँग्रेसच्या सात-आठ कार्यकर्त्यांनी स्टोरिया कंपनीच्या अंधेरीतील ऑफिसमध्ये घुसून कार्यालयाची तोडफोट केली आहे.

मुंबई : राहुल गांधींची खिल्ली उडवणारी जाहिरात बनवणं एका कंपनी चांगलच महागात पडलं आहे. आपल्या नेत्याविरोधात कृती करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयावर मंगळवारी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. यावेळी आंदोलनही करण्यात आलं. मुंबई युवकच्या कार्यकर्त्यांनी 'स्टोरिया' हे एनर्जी ड्रिंक बनवणाऱ्या कंपनीच्या अंधेरीतील कार्यालयात घुसून तोडफोड केली.
अंधेरीच्या पिनाकल बिझनेस पार्कमधून मुंबई पोलिसांनी युवक काँग्रेसच्या सात-आठ कार्यकर्त्यांना मंगळवारी ताब्यात घेतलं. या कार्यकर्त्यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरील कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करत घोषणाबाजी केला आणि आतील सामानाची तोडफोड केली. कोरोना परिस्थितीमुळे कार्यालयात काही मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतलं.

कंपनीच्या प्रतिनिधींनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसं पाहायला गेलं तर राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचा काँग्रेस हादेखील एक घटकपक्ष आहे. मात्र तरीही पक्षाच्या युवा मोर्चानं कायदेशीर मार्गानं विरोध करण्याऐवजी कायदा हातात घेणं पसंत केलं. एमआयडीसी पोलीस स्थानकात यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला असून मुंबई पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
स्टोरिया या फूड्स अँड बेवरेजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एका चॉकलेट शेकची जाहीरात केली आहे. यामध्ये राहुल गांधी यांचं विडंबन करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे युवक काँग्रेसने आक्रमक होत या कंपनीचं ऑफिस गाठलं.
काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप यांनी या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. भाई जगताप यांनी ट्वीट करत म्हटलं की, "आदरणीय सोनियाजी गांधी व आदरणीय राहुलजी गांधी यांची STORIA कंपनीने जाहिराती मधून केलेल्या बदनामीला चोख उत्तर दिल्याबद्दल मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत तसेच युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक!! असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी!! "
आदरणीय सोनियाजी गांधी व आदरणीय राहुलजी गांधी यांची STORIA कंपनीने जाहिराती मधून केलेल्या बदनामीला चोख उत्तर दिल्याबद्दल मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत तसेच युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक !!
— Bhai Jagtap - भाई जगताप (@BhaiJagtap1) April 27, 2021
असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी!! ☝️ pic.twitter.com/e68iUXwrZG























