(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील राजेश शाहांना जामीन मंजूर; 15,000 रुपयांच्या तात्पुरत्या रोख रकमेवर जामीन
Worli Hit And Run : मुख्य आरोपी मिहिर शहा विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. मिहिर हा 24 तासापासून फरार आहे.
मुंबई : वरळी हिट अॅन्ड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहचे वडील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुख्य आरोपी मिहीर शाह पहाटे अपघातापासून फरार आहे. मुख्य आरोपी मिहिर शहा विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. मिहिर हा 24 तासापासून फरार आहे. या प्रकरणात त्याचे वडिल राजेश शहा व चालक यांना अटक करण्यात आली होती. तर दुसरा आरोपी राजऋषी राजेंद्रसिंगला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
BMW हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपीचे वडील राजेश शहा आणि ड्रायव्हर राजऋषी राजेंद्र सिंह बिदावत यांना आज मुंबईतील शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीचे वडील राजेश शहा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. न्यायालयीन कोठडी मिळताच राजेश शहा यांनी जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाने आरोपी राजेश शहाला जामीन मंजूर केला. 15,000 रुपयांच्या तात्पुरत्या रोख रकमेवर जामीन मंजूर करण्यात आला.
कोर्टात काय घडले?
वरळीतील हिट अँड रनप्रकरणी मुंबई पोलिसांनी कोर्टात धक्कादायक माहिती सादर केली. अपघात झाल्यावर मुख्य आरोपी मिहीर शाहनं अनेकदा त्याच्या वडिलांना फोन केला. चालकाला ड्रायव्हिंग सीटवर बसव आणि तू त्याच्या शेजारी बस असं राजेश शाह मिहारला म्हणाले, असं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं. बीएनएस कलम 105 अन्वये जामीन मिळू शकतो की नाही, यावर आज न्यायालयात युक्तिवाद झाला. दरम्यान, मिहीर देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. मात्र अद्याप मिहिर शहाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही.
अपघात कसा झाला?
मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं कावेरी आणि प्रदीप नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. धडक दिल्यानंतरही चारचाकी गाडीच्या चालकाने गाडी न थांबवता तशीच पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कावेरी नाकवा यांना फरफटत नेलं. या अपघातात प्रदीप नाकवा हे थोडक्यात बचावले. मात्र कावेरी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर कावेरी यांना तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी कावेरी नाकवा यांना मृत घोषित केलं.