एक्स्प्लोर
15 कोटी हडपण्यासाठी पतीची हत्या, कल्याणमध्ये पत्नीला अटक
याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिने सुपारी दिलेल्या मारेकऱ्याला अटक केली आहे. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे पैसा माणसाला कुठल्या थराला घेऊन जाऊ शकतो, हे समोर आलं आहे.
कल्याण : पैशाच्या हव्यासापोटी पत्नीनेच पतीची सुपारी देऊन हत्या घडवल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिने सुपारी दिलेल्या मारेकऱ्याला अटक केली आहे. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे पैसा माणसाला कुठल्या थराला घेऊन जाऊ शकतो, हे समोर आलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रॉपर्टी विकून येणारा पैसे हवाहवासा वाटत असल्याने पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी देत हत्या घडवून आणल्याची घटना कल्याणच्या तिसगाव भागात घडली. तिसगाव भागात राहणारे शंकर गायकवाड यांच्या मालकीचा कल्याणमध्येच 25 हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड होता.
या भूखंडाची किंमत बाजारभावानुसार तब्बल 15 कोटी रुपये असल्याने तो विकून श्रीमंत होण्याची स्वप्न शंकर यांची पत्नी आशाला पडू लागली. त्यातून तिने काही बिल्डरांशी परस्पर बोलणंही सुरू केलं. मात्र नवऱ्याच्या कानी हा प्रकार पडताच त्याने विरोध केला. इथेच आशाच्या डोक्यात पतीचा काटा काढण्याचा विचार आला, अशी माहिती आहे. आपल्या चार मुलांचं आपल्या पश्चात काय होईल? याचाही विचार तिने केला नाही.
असा रचला हत्येचा कट
आशाचे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संपर्क असल्याचं बोललं जातं. त्यातून तिने शंकरच्या हत्येसाठी तब्बल 30 लाख रुपयांची सुपारी दिली. त्यापैकी चार लाख रुपये तिने अॅडव्हान्स म्हणून दिले. हे पैसेदेखील तिने एका बिल्डरकडूनच टोकन म्हणून घेतल्याचा आरोप आहे.
सुपारी दिल्यानंतर आशाने 18 मे रोजी शंकर गायकवाड यांना शीतपेयातून गुंगीचं औषध पाजलं. ते बेशुद्ध पडल्यानंतर गुंड हिमांशू दुबे, जगन म्हात्रे, राज सिंग आणि प्रितम या चौघांनी त्यांना रिक्षातून वांगणी-नेरळ दरम्यान एका निर्जन ठिकाणी नेऊन चाकूने भोसकून त्यांची हत्या केली आणि मृतदेह तिथेच टाकून दिला.
शंकर गायकवाड दिसत नसल्याने नातेवाईकांनी विचारपूस केल्यानंतर सुरुवातीला शंकर हे साताऱ्याला मांढरदेवीच्या दर्शनाला गेल्याची बतावणी आशाने केली. 21 मे रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या सगळ्यात शंकरचा भाऊ आणि इतर नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना आशाची चौकशी करण्याची मागणी केली आणि हा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी शंकर यांचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह हस्तगत करून तो गायकवाड कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
अनैतिक संबंधातून हत्या?
आशाचे अनेक तरुणांसोबत अनैतिक संबंध होते, शिवाय तिचे काही व्हिडीओही समोर आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. तिच्या या संबंधांची माहिती पती शंकर यांना मिळाल्याने त्यांच्यात खटके उडत होते. त्यामुळे मालमत्तेच्या वादासोबतच हत्येमागचं हे सुद्धा एक कारण असण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आशा आणि हिमांशू दुबे या दोघांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरु असून त्यातूनच सत्य आणि हत्येचं नेमकं कारण समोर येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणात इतर चार आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement