Sanjay Raut : मी बाहेर असो वा नसो 2024 पर्यंत मविआचा मुख्यमंत्री होईल, संजय राऊतांचं वक्तव्य
Sanjay Raut : मी बाहेर असो वा नसो 2024 पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
Sanjay Raut : शिवसेना ( Shivsena ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला आणि 2024 पर्यंत पुन्हा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मी बाहेर असो वा नसो 2024 पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही. सध्याच राजकीय वातावरण अस्थिर आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्याचं त्यांनी सांगितलं. राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि शिंदे गट आणि विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली.
'2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री'
आमच्यावर असे खोटे आरोप आणि खोट्या कायदेशीर कारवाया होत राहतील, असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, 2024 पर्यंत आमची लढाई सुरुच राहील. 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल. मी तुरुंगाबाहेर असो वा हे लोक पुन्हा मला तुरुंगात टाकू दे, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : 2024 पर्यंत मविचा मुख्यमंत्री असेल - राऊत
'शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही'
शिवसैनिकांवर झालेल्या हल्ल्यांसदर्भात पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला यावर राऊतांनी शिवसैनिकाचं रक्त स्वस्त नाही, असं म्हणत विरोधकांना इशारा दिला आहे. शिवसैनिकांवर हल्ले करणार असाल, शिवसैनिकाचं रक्त सांडवणार असाल तर, शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही हे, विरोधकांनी लक्षात घ्यायला हवं, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
'शिवसैनिकाच्या रक्ताच्या थेंबाचा हिशोब द्यावा लागेल'
शिवसैनिकाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब गेल्या 50 वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आहे, ज्याने शिवसेनेचं रक्त सांडवण्याचा प्रयत्न केला ते राजकारणातून, जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले आणि त्यांचं फार काही चांगलं झालं नाही.
'चुकीच्या कारवायांवर न्यायालयाचे हातोडे'
सत्ताधाऱ्यांनी पारदर्शकपणे काम करायला हवीत. चुकीच्या कारवायांवर न्यायालयाचे हातोडे पडत आहेत. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना जनतेच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल. वारंवार खोट्या कारवाया होत राहतील. आम्ही अन्याया विरोधात लढत त्यांना टक्कर देत राहू असं राऊतांनी सांगितलं आहे.