लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय?, राज ठाकरेंची विचारणा; सरकारला नऊ सूचना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? असा प्रश्न विचारला. सोबतच सरकाला नऊ सूचनाही केल्या.
मुंबई : लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी बैठकीत केलेल्या सूचनांबद्दल माहिती दिली. तसंच शहराच्या एन्ट्री पॉईंटवर नियम कडक करायला हवे. प्रत्येक वेळी माणुसकी उपयोगाची नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, "या लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय असा प्रश्न सरकारला दिलं. सरकार त्याचं उत्तर देईल अशी अपेक्षा आहे. कधीतरी लॉकडाऊन काढावाच लागणार आहे. कोरोना व्हायरसवर लस येईपर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार असंही नाही. त्यामुळे लॉकडाऊन उठवण्याआधी 10 ते 15 दिवस आधी सांगणं आवश्यक आहे. काय होणार, कोणत्या गोष्टी सुरु होतील याची माहिती देणं गरजेचं आहे. त्यामुळे सरकारने एक्झिट प्लॅन महाराष्ट्रासमोर लवकरात लवकर ठेवावा."
राज ठाकरे यांच्या सूचना
- कन्टेन्मेंट झोनमध्ये फोर्स वाढव. काही ठिकाणी एसआरपीएफचे जवानही तैनात करावे.
- छोटे दवाखाने सुरु करावेत. तिथे एखाद्या पोलिसाची नेमणूक करावी
- स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी
- तपासणी केल्याशिवाय परप्रातियांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नका
- राज्य स्थलांतरित कायद्याखाली परप्रांतियांची नोंद करावी
- महाराष्ट्रातील तरुण-तरुणींपर्यंत रोजगाराची माहिती पोहोचवावी
- शाळा कशा सुरु करणार? पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे
- महापालिका कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस कर्मचारी यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी
- लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? तो लवकरात लवकर महाराष्ट्रासमोर ठेवावा
चुका आणि त्रुटी काढायची ही वेळ नाही : राज ठाकरे सरकार कसं काम करत आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, "सरकार उपलब्ध साधनांच्या आधारे काम करत आहे. सरकारच्या कामात काही चुका आणि त्रुटी असतीलही. मात्र, ही वेळ त्रुटी आणि चुका दाखवण्याची नाही," बैठकीला कोणाची हजेरी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, रासपचे नेते महादेव जानकर, शेकापचे नेते जयंत पाटील, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई इत्यादी नेते हजर होते.