मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार
13 जुलै 2021 रोजी पश्चिम उपनगरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागात कमी दाबाने होणार आहे.
मुंबई : पावसाळा सुरू झाला असला तरी मुंबईकरांना काही दिवस पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. पश्चिम उपनगरातील जुहू, विलेपार्ले, सांताक्रुज व खार (पश्चिम), अंधेरी (पूर्व व पश्चिम) भागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तांत्रिक अडचणी समोर आल्या आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अंतर्गत पाणीपुरवठ्याशी संबधित झडप बदलण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील पाणीपुरवठा 13 जुलै 2021 रोजी बंद अथवा कमी दाबाने होणार आहे.
झडप बदलण्याच्या कामामुळे एच पश्चिम, के पूर्व व के पश्चिम या 3 विभागातील जुहू, विलेपार्ले, सांताक्रुज, खार (पश्चिम), अंधेरी (पूर्व व पश्चिम) इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा 13 जुलै 2021 रोजी बंद राहणार किंवा कमी दाबाने होणार आहे. तरी संबंधीत परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करुन पाणी जपून वापरण्याचं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे वेरावली जलाशय क्र 3 चे भाग क्र 2 चे वांद्रे आऊटलेटवर असलेल्या 1200 मिलि मीटर व्यासाची झडप बदली करण्याचे करण्याचे काम मंगळवार दिनांक 13 जुलै 2021 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून ते रात्री 10.00 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या काळात एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागात काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्याचप्रमाणे के पश्चिम व के पूर्व विभागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित होणार आहे,” अशी माहिती बीएमसीने दिली.
कोणत्या भागात पाणी पुरवठा खंडीत होणार? कोणत्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार?
के पश्चिम विभागः
गिलबर्ट हिल – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी 8.30 ते 11.15 वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.
जुहू-कोळीवाडा (उर्वरित पुरवठा) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी 10.00 ते दुपारी 12.15 वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात सकाळी 8.00 ते 9.15 वा. या कालावधी दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
चार बंगला – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 12.15 ते 2.10 वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.
विलेपार्ले (पश्चिम), जे. व्ही. पी. डी., नेहरु नगर – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.55 वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील.
के पूर्व विभागः
विलेपार्ले (पूर्व) (संपूर्ण विलेपार्ले पूर्व डोमेस्टिक एअरपोर्ट) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 5.30 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.
सहार मार्ग, ना. सी. फडके मार्ग, ए. के. मार्ग, गुंदवली गावठाण, तेली गल्ली, साईवाडी, जिवा महाले मार्ग – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 5.30 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.
मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, जुना नागरदास मार्ग – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री 8.00 ते 10.30 वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.
एच पश्चिम विभागः
खोतवाडी, गझदरबंध, एस. व्ही. मार्ग (खार), लिंकींग रोड (खार), सांताक्रुझ (पश्चिम), खार (पश्चिम) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी 6.30 ते 9.00 वाजेपर्यंत असणा-या परिसरात सकाळी 0 ते 9.00 या कालावधी दरम्यान पाणीपुरवठा होईल.
एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागातील सदर परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, सदर कामाच्या दरम्यान दिनांक 13 जुलै 2021 रोजी रात्री 10.00 वाजेपासून सकाळी 10.00 वाजेपर्यंत काही ठिकाणी कमी दाबाने, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.