एक्स्प्लोर
मिरा भाईंदरमधील शाळेत बजरंग दलातर्फे बंदूक आणि रायफल प्रशिक्षण?
मिरा भाईंदरचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्या 'सेव्हन स्क्वेअर' शाळेत बजरंग दलाने तरुणांसाठी शौर्य प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता, यामध्ये बंदुका आणि रायफल चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याचा आरोप होत आहे.
![मिरा भाईंदरमधील शाळेत बजरंग दलातर्फे बंदूक आणि रायफल प्रशिक्षण? weapons training by Bajrang Dal at BJP MLA's school at Mira Road, Police probes मिरा भाईंदरमधील शाळेत बजरंग दलातर्फे बंदूक आणि रायफल प्रशिक्षण?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/02115544/Mira-Bhainder-Bajrang-Dal-Riffle-and-Gun-Training-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वसई : विश्व हिंदू परिषदेअंतर्गत बजरंग दलाने कोकण प्रांत शौर्य प्रशिक्षण वर्गाचं आयोजन मिरा भाईंदर भागातील 'सेव्हन स्क्वेअर' या शाळेत केलं होतं. मात्र यावेळी बंदूक आणि रायफलीचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं. विशेष म्हणजे ही शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची आहे. या प्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
मिरा भाईंदरचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्या 'सेव्हन स्क्वेअर' शाळेत बजरंग दलाने 25 मे ते 1 जून या कालावधीत तरुणांसाठी शौर्य प्रशिक्षण वर्ग सुरु केले होते. या शौर्य प्रशिक्षण वर्गासाठी 29 जिल्ह्यांतून 130 विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रशिक्षण वर्गाचे काही फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. या फोटोमध्ये काही तरुण हातात रायफल आणि बंदूक धरुन प्रशिक्षण घेत असल्याचं दिसत आहे.
याबाबत बजरंग दलाचे कोकण प्रांत संयोजक संदीप भगत यांच्याशी बातचित केली असता कोणत्याही हत्याराचं ट्रेनिंग दिलं नसल्याचा निर्वाळा 'एबीपी माझा'शी बोलताना दिला. सोशल मीडियामध्ये वायरल झालेले फोटो इथले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. इथे केवळ तरुणांसाठी शौर्य प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं.
आपत्कालीन परिस्थितीशी कसा मुकाबला करायचा, रस्सी चढणे, दोर उडी इत्यादीचं मार्गदर्शन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यात विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांचा काहीही संबंध नसल्याचाही दावा त्यांनी केला. बजरंग दलाच्या बदनामीसाठी हे षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नवघर पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस आता त्या प्रशिक्षणामध्ये कोणतं ट्रेनिंग दिलं जात होतं, ते फोटो कोणी वायरल केले, ते फोटो कुठले आहेत, याचा तपास करत आहेत.
'एबीपी माझा'च्या हाती एक्स्क्लुझिव्ह व्हिडिओ क्लीप लागली असून त्यात एका तरुणाकडे रायफल सदृश्य वस्तू होती. त्याला विचारल्यावर त्यांने तो दंड असल्याचं सांगितलं. याबाबत मात्र डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे मुंबई सचिव सादिक बाशा यांनी बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मिरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मात्र कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र शाळा व्यवस्थापक शाळांना सुट्टी असल्यास सार्वजनिक कार्यक्रमास सशुल्क परवानगी देते. यात माझा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी फोनवरुन सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)