(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Water Shortage: बोरिवलीतील गोराई गावात पाण्याचा ठणठणाट; पाण्यासाठी रहिवाशांची उच्च न्यायालयात धाव, आज सुनावणी
Water Shortage in Gorai Village: पाण्यासाठी बोरिवलीतील गोराई गावातील रहिवाशांनी चक्क उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज याप्रकरणी सुनावणी पार पडणार आहे.
Water Shortage in Gorai Village in Borivali West : मुंबई : बोरिवली पश्चिमेतील (Borivali West) गोराई गावात (Gorai Village) रहिवाशांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना (Inadequate Water Supply) करावा लागत आहे. याप्रकरणी रहिवाशांनी उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली असून पालिकेनं सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर आज उच्च न्यायालयात (High Court) सुनावणी होणार आहे. गोराई विलेजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या (Gorai Villagers Welfare Association) वतीनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
एकीकडे लोकसभा निवडणुकांची धामधूम आणि दुसरीकडे पाणीटंचाई आणि दुष्काळाचं सावट. राज्यातील अनेक गावं एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहेत. कित्येक किलोमीटरची पायपीट करुन पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी धडपड अनेक गावकऱ्यांची गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यापाड्यात, गावांप्रमाणेच मुंबईतील काही भागांतही भीषण पाणीटंचाई आहे. बोरिवली पश्चिमेतील गोराई गावातील रहिवाशांना पिण्याचं पाणी मिळेनासं झालं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी चक्क गावकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
वाढत्या उकाड्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष वाढलं असून मुंबईतील गोराईत रहिवाशांना पाणी मिळेनासं झालं आहे. याप्रकरणी रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून पालिकेनं सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे.
प्रकरण नेमकं काय?
बोरिवली पश्चिमेतील गोराई गावात रहिवाशांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. पाणी कमी दबावानं येत असून रहिवाशांचे हाल होत आहेत. 5 हजार कुटुंबं या ठिकाणी राहत असून सुमारे 2 हजार कुटुंबीयांकडे पाण्याचे नळ आहेत. मात्र, यातून पाणी येईनासं झालं आहे. गोराई विलेजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्या वतीनं युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितलं की, "या ठिकाणी विहिरी आहेत; मात्र पाणी पिण्यास योग्य नाही, न्यायालयानं पालिकेला जास्त दाबानं पाणीपुरवठा करण्यास सांगितलं होतं. मात्र, तसं होताना दिसत नाही. त्यामुळे पालिकेनं पाण्याची समस्या सोडवावी. तसेच, टँकरनं पाणीपुरवठा करावा." न्यायालयानं हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली होती. आज याप्रकरणी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.