(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हिडीओ, मुंबईतील अंधेरीत पोलिसांची फेरीवाल्यांना मारहाण
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी कारवाईसाठी गेले होते. मात्र फेरीवाल्यांनी पोलिसांना मारहाण केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मुंबई : मुंबईत पोलिसांनी फेरीवाल्यांना मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. अंधेरीतील डीएननगर परिसरातील ही घटना आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना हा सगळा प्रकार घडला आहे.
जुहू गल्ली येथे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रार आल्यानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गनामे कारवाईसाठी तेथे गेले होते. पोलिसांच्या कारवाईला काही फेरीवाल्यांनी विरोध केला, त्यावेळी पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न फेरीवाल्यांनी केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी आमच्या दुकानात शिरुन दुकानातील सामान बाहेर फेकून दिले. तसेच आमच्या मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप मारहाण झालेल्या फेरीवाल्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
2016 ला याठिकाणी आग लागली होती. त्यावेळी अनधिकृत दुकानांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत याठिकाणी पोहचू शकल्या नव्हत्या आणि 9 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी आम्ही कारवाई केली, अशी माहिती पोलिसांनी यांनी दिली.