वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना : चार दिवस उलटूनही जेसीबीचा चालक अद्याप ढिगाऱ्याखालीच, 90 तासांनंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
Versova Surya Project Accident : वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटनेला चार दिवस उलटले आहेत. चौथ्या दिवशीही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच असून जेसीबी चालक अद्याप ढिगाऱ्याखालीच आहे.
वसई : वसईतील वर्सोवा येथे सूर्या प्रकल्पाचे काम सुरू असताना 50 फूट खोल खड्ड्यात पोकलेन काम करत असताना त्यावर सिमेंटचा गर्डर कोसळून दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेला चार दिवस उलटले तरी पोकलेन चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाच्या अद्याप यश आलेलं नाही.
वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना
हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात आणखी तीन-चार दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या एनडीआरएफच्या टीम सिमेंटचा गर्डर फोडण्याचे काम करत आहे. हा भला मोठा गर्डर फोडल्यानंतर कोसळलेला मलबा हटवण्यात येईल आणि त्यानंतर पोकलेन चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात येईल, या सर्व रेस्क्यू ऑपरेशनसाठी आणखी तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जेसीबी चालकाचा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न
वसईच्या वर्सोवा ब्रिजवळ सूर्या पाईपलाइनच खोदकामावेळी मातीचा मलबा खचून जेसीबीसह ऑफिस कंटेनर मातीच्या मलब्याखाली अडकला. ठाणे-मुंबई ब्रिजजवळ ही घटना घडली आहे. कंटेनर खाली अडकलेल्या पाच ते सात व्यक्तींना मलब्याखाली याआधीच बाहेर काढलं आहे. मात्र आता जेसीबीचा चालक जेसीबीसह मल्यब्याखाली अडकला आहे.
चौथ्या दिवशीही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
नायगाव पोलीस आणि वसई विरार पालिकेची अग्निशमन यंत्रणा यांच्याकडून बचावकार्य राबवण्यात येत आहे. 29 मे रोजी रात्री 9:30 च्या सुमास ही दुर्घटना घडली आहे. सध्या जेसीबीचा चालकाचा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. रेस्क्यूसाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
एमएमआरडीएच्या माध्यमातून वसई खाडीजवळील ससूनवघर गावात सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचं काम सुरू आहे. बुधवारी, 29 मे रोजी रात्री साधारण 9 वाजेच्या सुमारास प्रकल्पाचं काम सुरू असताना माती खचून दुर्दैवी घटना घडली होती. वसई खाडी ओलांडण्यासाठी टनल बोरिंग मशीनच्या साहाय्याने भूयारीकरणाचे काम सुरु आहे. या कामासाठी टनल बोरिंग मशीन जमिनीच्या भूभागात सुमारे 32 मीटर खोलीवर पोहचवण्यासाठी लॉन्चिंग शाफ्टचे खोदकाम सुरू होतं. या कामाच्या वेळी ही दुर्दैवी घटना घडली. एकूण 32 पैकी सुमारे 20 मीटर शाफ्टचं काम पूर्ण झालं असताना अचानक तेथील माती खचल्याने दुर्घटना घडल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.