(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vedanta Foxconn : ...तर वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात असता; उदय सामंत यांचा दावा
Vedanta Foxconn : राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने वेदांता-फॉक्सकॉनला योग्य प्रतिसाद न दिल्यानेच त्यांनी गुजरात निवडले असल्याचा आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.
Vedanta Foxconn : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीकडून शिंदे-फडणवीस सरकारवर होत असलेल्या टीकेला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे. महविकास आघाडी सरकारने कधीच वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला पॅकेज दिले नाही. मविआ सरकारच्या काळात हाय पॉवर कमिटीची बैठकदेखील झाली नाही. ही बैठक झाली असती तर वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प राज्याबाहेर गेलाच नसता असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.
उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, जुलै महिन्यात त्यांना अधिकचे पॅकेज देण्यासाठी हाय पॉवर कमिटीची बैठक झाली होती. ज्या सात महिन्यात त्यांना अधिकचे पॅकेज देण्यात यायला हवे होते, त्यावेळेस ते दिले गेले नाही. यामुळेच कंपनी राज्याबाहेर गेली. पण हे सत्य लपवून आमच्यावर आरोप केले जात असल्याचे सामंत यांनी म्हटले. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आम्ही भेट घेणार आहोत. राज्यात नवीन गुंतवणूक आणण्याबाबत त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे. पंतप्रधान आश्वासन पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात असाच किंवा यापेक्षाही मोठा प्रकल्प राज्यात येत्या काही दिवसात येईल, असे आश्वासन सामंत यांनी राज्यातील तरुणांना दिले. लॉजिस्टिक्स पार्कसाठी एमआयडीसीने जागा देण्याचे निश्चित केले असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
दुटप्पी भूमिका
प्रकल्पांवरून विरोधक दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका सामंत यांनी केली. या प्रकल्पासारखा मोठा प्रकल्प कोकणात येणार होता. रिफायनरीचा हा प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पाला विरोध केला जात असल्याचे सामंत यांनी म्हटले. रिफायनरी प्रकल्प नाणार इथून आम्हीच स्थलांतरीत केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 जानेवारी 2022 रोजी केंद्र सरकारला पत्र देऊन बार्सू येथे रिफायनरी प्रकल्प करण्याचे निश्चित केले होते. मात्र, तिथे असलेले स्थानिक लोकप्रतनिधींनी याला विरोध करत असल्याचे सामंत यांनी म्हटले.
सेमीकंडक्टरला वाढती मागणी
भारतातील सेमीकंडक्टरची बाजारपेठ 2020 मध्ये 15 अब्ज डॉलर इतकी होती. ही बाजारपेठ 2026 पर्यंत 63 अब्ज डॉलर इतकी होण्याचा अंदाज आहे. तैवान, चीनसारख्या मोजक्याच देशांमध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती केली जाते. आगामी डिजीटल तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता सेमीकंडक्टरला मोठी मागणी असणार आहे. चीन-तैवानमधील तणाव, कोरोना महासाथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला होणाऱ्या सेमीकंडक्टर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या: