Vashi Accident : रेल्वे रुळ ओलांडताना लोकलखाली आला, प्रवाशांनी अख्खा डबाच हालवून त्याला बाहेर काढलं, पण जीव मात्र गेला
Vashi Local Train Accident : गाडीखाली आलेल्या प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी अख्खा डबाच हलवला आणि त्याला बाहेर काढलं.
मुंबई: वाशी रेल्वे स्टेशनवर रुळ ओालांडताना (Vashi Local Train Accident ) गाडीखाली आलेल्या प्रवाशाचा अखेर मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्मवरील सर्व प्रवाशांनी त्यांना गाडीखालून काढलं होतं. पण जखमी झालेल्या प्रवाशाचा अखेर मृत्यू झाला. राजेंद्र खाडके (Rajendra Khadke Death) असं या मृत प्रवाशाचं नाव आहे.
वाशी रेल्वे स्टेशनवर रेल्वे रूळ ओलांडताना राजेंद्र खाडके नावाचे प्रवासी गाडी खाली आले. खाडके हे काही काळ गाडीखाली अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी प्लॅटफॉर्मवरच्या आणि गाडीतल्या प्रवाशांनी एकत्र येत चक्क सर्वशक्तिनिशी गाडीचा डबा हलवला होता. प्रवाशांच्या या समूहशक्तीतून त्यांना डब्याखालून बाहेर काढण्यात यश आलं. मात्र राजेंद्र खाडके गंभीर जखमी झाले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्रवाशांनी डबाच हलवला
गाडीखाली प्रवासी आल्याचं लक्षात येताच डब्यातील आणि प्लॅटफॉर्मवरील सर्व प्रवाशांनी सर्वशक्तिनिशी गाडीचा डबा हलवला. त्यानंतर राजेंद्र खाडके यांची सुटका करण्यात आली. जखमी अवस्थेत असलेल्या खाडके यांनी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
परीक्षेला निघालेल्या तीन भावंडांना चिरडले
छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर असणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत असलेले तिघेही बहिण-भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळतात पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातात मयत झालेले तिघेजण परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ते मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृत बहीण भावाची नावं आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरूवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेल समोर आपल्या दुचाकीवरून अंभोरे बहिण भाऊ प्रवास करत होते. याचवेळी दोन हायवांमध्ये ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरु होती. याच स्पर्धेच्या नादात दोन्ही पैकी एका हायवा चालकाने अंभोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
थेट अंगावरून हायवा गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला असल्याची माहिती उपस्थितीत नागरिकांनी दिली आहे. तर, तिनही मृतदेह शासकीय घाटी रूग्णालयात पाठवले आहे.
ही बातमी वाचा: