वसंत मोरे यांच्या मेसेजला अखेर राज ठाकरे यांचा प्रतिसाद, आज सकाळी अकरा वाजता 'शिवतीर्थ'वर भेट
महत्त्वाचं म्हणजे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांना तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर रविवारी राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर भेट निश्चित झाली.

मुंबई : मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना अखेर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ मिळाली आहे. वसंत मोरे आज (11) मुंबईत 'शिवतीर्थ' या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता ही भेट होईल. महत्त्वाचं म्हणजे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांना तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर रविवारी (10 एप्रिल) राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर भेटीची वेळ निश्चित झाली.
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे यांच्या भाषणामुळे आपली अडचण झाली असं वसंत मोरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं. यानंतर मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्याऐवजी साईनाथ बाबर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली.
पुणे शहराध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर वसंत मोरे इतर पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती. शिवाय वसंत मोरे यांनीही आपल्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. परंतु मनसे सोडून जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यातच आज वसंत मोरे थेट राज ठाकरे यांच्या भेटीला येत आहेत. या भेटीच्या वेळी पुण्यातील मनसेचा कुठलाही पदाधिकारी वसंत मोरे यांच्यासोबत नसेल. वसंत मोरे एकटेच मुबंईमध्ये राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं समजतं.
पुण्यातील नाराजीनाट्यानंतर राज ठाकरेंनी शहरातील प्रमुख नेत्यांना मुंबईत बोलावलं होतं. परंतु यात वसंत मोरेंना त्यावेळी निमंत्रण नव्हतं. यानंतर पुणे मनसे शहराध्यक्षपदावरुन त्यांची हकालपट्टी करत साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली. या सगळ्या घडामोडींनंतर वसंत मोरे यांनी गुरुवारी (7 एप्रिल) मेसेज करुन राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. परंतु राज ठाकरे यांनी सुरुवातीला त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नव्हता. आता मात्र वसंत मोरेंना भेटीसाठी वेळ मिळाली असून आज ही भेट होणार आहे. या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा होते, काय निर्णय होतो हे पाहावं लागेल.
'या' नेत्यांचा वसंत मोरे यांच्याशी संपर्क
दरम्यान सर्वपक्षीय नेत्यांकडून ऑफर असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी आपल्याला त्यांच्या पक्षात येण्याचं आमंत्रण दिल्याचं वसंत मोरे यांनी आधीच म्हटलं होतं. कोणकोणत्या पक्षातून कोणी कोणी आपल्याला संपर्क केली याची माहितीही त्यांनी दिली. "शिवसेनेकडून आपल्याला वरुण सरदेसाई, पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री तानाजी सावंत यांनी फोन केल्याचं वसंत मोरेंनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे, माजी महापौर दत्ता धनकवडे, अप्पा रेणुसे यांनी संपर्क साधला. कॉंग्रेसकडून मोहन जोशी, अरविंद शिंदे यांनी संपर्क केला आहे तर भाजपकडून प्रवीण दरेकर यांचाही फोन येऊन गेल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं. सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्याला फोन केल्याचं ते सांगत आहेत. मात्र त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आलेला नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या
- MNS : वसंत मोरेंना अखेर राज ठाकरे भेटणार; उद्या सकाळी 11 वाजता 'शिवतीर्थ'वर भेट होणार
- वसंत मोरेंची राज ठाकरेंना भेटीसाठी विचारणा, राज यांचा अद्याप प्रतिसाद नाही
- मागील तीन दिवसांत राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेसकडून ऑफर; पण...: वसंत मोरे
- Vasant More : साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर वसंत मोरे यांचं ट्वीट
- Vasant More : नाराजी भोवली! वसंत मोरेंची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
- नाराजी नाट्यानंतर राज ठाकरेंनी पुण्यातील मनसे नेत्यांना मुंबईत बोलावलं, पण वसंत मोरेंना...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
