मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक, गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं भाजपचे षडयंत्र; वर्षा गायकवाडांचा आरोप
Mumbai Congress Protest : मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून उभारलेल्या शाळा खाजगी लोकांच्या खिशात घालण्याचा घाट असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

मुंबई : शिक्षण आणि आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे असा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केला. मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी वर्षा गायकवाड यांनी भाजप आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आरोप केले.
मुंबई महानगर पालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपा सरकार मात्र स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली या शाळा खाजगी लोकांच्या हाती देत आहे. याला पालकांचा व काँग्रेसचा तीव्र विरोध असून भाजपा सरकारचा हा कुटील डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.
भाजपा सरकारला बांगड्यांचा आहेर
मुंबई महानगरपालिकेच्या मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाच्या विरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार अस्लम शेख यांनी पालक आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत तीव्र आंदोलन करून राज्य सरकारला जाब विचारला. यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढांना भेटण्याचा काँग्रेस शिष्टमंडळाने प्रयत्न केला. पण पोलिसांनी भेटू दिले नाही. म्हणून संतप्त शिष्टमंडळाने पालकमंत्री मंगलप्रभात लोढा व भाजपा सरकारला बांगड्यांचा आहेर दिला.
बिल्डर मित्रांसाठी मनपाच्या शाळा बंद करण्याचा घाट
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "गेल्या दशकांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या मालवणी टाऊनशीप शाळेचे मनमानी खासगीकरण करण्याचे पाप केले जात आहे. हे अतिशय धक्कादायक आणि संतापजनक आहे. भाजप सरकारच्या या गरीबविरोधी कृतीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे."
खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा (RTE) आणला. परंतु भ्रष्ट भाजपा सरकार हा मूलभूत अधिकार देखील गोरगरिबांकडून हिरावून घेत आहे. महानगरपालिकेच्या शाळा चालू ठेवणे हे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचे मुख्य उद्दिष्ट असायला हवे. पण हे सरकार आपल्या बिल्डर मित्रांसाठी मनपाच्या शाळा बंद करून खासगी लोकांच्या घशात घालत आहे."
ही बातमी वाचा:























