कल्याणमध्ये विकलांग कुष्ठरुग्णांचे लसीकरण, केडीएमसी ठरली राज्यातील पहिलीच महापालिका
केडीएमसी प्रशासनाने हनुमान नगर कुष्ठरुग्ण वसाहतीतील 150 विकलांग कुष्ठरुग्णांचे कोरोना लसीकरण केले आहे.
कल्याण : एकीकडे सर्वसामान्यांना अद्याप कोविडची लस मिळत नसताना तिथे समाजातील विकलांग, कुष्ठरुग्णांचा कुणी विचार करत नाहीये. मात्र अशा विकलांग कुष्ठरुग्णांचे लसीकरण करणारी कल्याण डोंबिवली ही राज्यातील बहुधा पहिलीच महापालिका ठरली आहे. कल्याण पूर्वेतील हनुमान नगर कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये केडीएमसीतर्फे आज 150 विकलांग कुष्ठरुग्णांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.
सद्यस्थितीला राज्यात लसींचा तुटवडा असल्याने दररोज कोरोना लसीकरण सुरू ठेवणे महापालिकेला शक्य होत नाहीये. त्यात लस उपलब्ध असल्यास ती घेण्यापूर्वी टोकन घेणे आवश्यक आहे. मात्र आधीच कुष्ठरुग्ण आणि त्यातही विकलांग असणाऱ्या या व्यक्तींना हे सोपस्कार पाळणे म्हणजे जणू रोगापेक्षा इलाज भयंकर. मात्र त्यांची ही व्यथा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या गजानन माने यांनी केडीएमसी प्रशासनापर्यंत पोहोचवली.
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. केवळ प्रतिसादच दिला नाही तर तो आज लगेच प्रत्यक्षातही उतरवला. या विकलांग कुष्ठरुग्णांना कोरोना केंद्रांवर येता येणं शक्य नसल्याने केडीएमसी प्रशासनाने थेट त्यांच्याच अंगणात हे कोरोना केंद्र नेले. आणि या हनुमान नगर कुष्ठरुग्ण वसाहतीतील 150 विकलांग कुष्ठरुग्णांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.
अशाप्रकारे कुष्ठरुग्णांसाठी कोरोना लसीकरण उपक्रम राबवलेली कल्याण डोंबिवली ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. जिने 'शासन आपल्या दारी' ही शासकीय उक्ती खरी करून दाखवली. कल्याण डोंबिवलीप्रमाणे राज्यातील इतर स्थानिक संस्थांनीही असाच पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.